Monday, November 18, 2019

व्ही शांताराम यांचा “ झुंज ” आणि “ पिंजरा ”


|| श्री ||
" झुंज " आणि " पिंजरा "
व्ही शांताराम बापूंचे बरेच चांगले चित्रपट मला बघायला मिळाले ते अगदी शाळकरी वयात आणि याचं श्रेय जातं ते माझ्या आईला ....अगदी लहान वयापासून वाचनाची किंवा दर्जेदार चित्रपट निवडून बघायची चोखंदळ नजर तिने माझ्यात निर्माण केली. ( आता ती नजर मला राजस आणि रथिनमध्ये निर्माण करायची आहे. )  “ दो आंखे बारा हाथ ”, “ नवरंग ”, “ झनक झनक पायल बाजे ”, “ गीत गया पत्थरोने ”. “चानी “, “ झुंज “ , “ पिंजरा ” “ संत तुकाराम “ “ गोपालकृष्ण ” असे त्यातले काही चित्रपट. या पैकी पिंजरा आणि झुंज हे दोन माझे अत्यंत आवडते चित्रपट. “ पिंजरा “चा शेवट मला आवडला नाही हेही कबुल करतो. म्हणजे मी दिग्दर्शक असतो तर चित्रपटाच्या शेवटी मास्तर आणि त्या मैनाचे लग्न लाऊन दिले असते. पिंजरा मधल्या मास्तर आणि तमासगीर मैना यांचा संघर्ष हा मला अत्यंत कलात्मक वाटतो. अगदी ग्रेट कल्पना म्हणावे असा. प्रत्येकाची आपापली काही तत्वे, संस्कार असतात आणि ते घेऊन माणसं या जगात वारतात त्यातून प्रसंगी त्यांचा सामना होतो आणि मग ठिणग्या उडतात. कधी कधी या ठिणग्या फुलबाजीच्या आतीश्बाजीसारख्या मोहक असतात. त्यांचा चटका बसत नाही. या ठिणग्यांकडे , या आतशबाजीकडे एकटक बघत राहावं असं वाटतं. “ पिंजरा ” हा चित्रपट असाच एका तत्वाला उराशी कवटाळून बसलेल्या मास्तरची आणि आपल्या जन्मजात देणगी मिळालेल्या कलेवर निष्ठा ठेऊन ती कला हेच देवत्व मानणाऱ्या तमाशा नर्तकीच्या संघर्षातून निर्माण झालेल्या आतषबाजीची कथा आपल्यासमोर मांडतो. एकापेक्षा एक सुंदर गीते, लावण्या, गण, गवळणी यांच्या माध्यामातून व्ही. शांताराम यांनी हि आतषबाजी , हे सौदर्य अफलातून टिपलेलं आहे. मास्तर आणि मैना यांच्यामधला हा संघर्ष आपल्यासमोर जीवनाचे अनेक पदर उघडत जातो. जगण्याची नवी परिभाषा मनात तयार करत जातो. मनावरचे कितीतरी ताण काढून टाकतो मात्र शेवट पुन्हा आपल्याला खट्टू करतो. निदान मला तरी.  
“ झुंज ” हा शांताराम बापूंचा आणखी एका चित्रपट माझा अत्यंत आवडता. दलित आणि सवर्ण प्रश्नावर किंवा संघर्षावर आधारित माझ्या पाहण्यातला हा सर्वात सुंदर चित्रपट. अतिशय संवेदान्शैल असलेला हा विषय शांताराम बापूनी रुपेरी पडद्यावर खूपच सुंदरपणे हाताळलाय. माझी आवडती मराठी कलाकारांची जोडी रवींद्र महाजनी आणि रंजना हे यात असले तरी यातले कांबळे मास्तर मला खूप आवडून गेले. “ झुंज ” मधली गाणी खरंच खूप सुंदर आहेत. त्यातल्या त्यात “ निसर्गराजा ऐक सांगतो ” हे तर आजही प्रसिद्ध आहे. उच्च वर्णीय इनामदार त्यांची गावावरील हुकुमशाही. त्यात दलीतांबद्धल असलेला तिरस्कार मात्र या इनाम्दाराचा उच्चशिक्षित आणि पैलवान असलेला तरुण मुलगा सर्व सामान्य माणसे, दलित, पिडीत यांच्या बाजूने असणारा आणि त्यातून इनामादाराचे घर आणि गाव यात उद्भवलेला संघर्ष . “ झुंज ” चा शेवट मात्र व्ही. शांताराम यांनी अगदी सुखांत दाखवला होता. किमान माझ्यासारख्या शेवट गोड व्हावा या मताच्या माणसासाठी आनंदाची गोष्ट होती.
सांगायचा मुद्दा हा कि व्ही शांताराम हे नाव कानावर पडले कि मला त्यांचे हे दोन नितांत सुंदर चित्रपट आठवतात आणि आठवत राहतील.......  श्याम सावजी ..  पंढरपूर

Sunday, October 27, 2019

नर्क चतुर्दशीची ती रम्य पहाट


|| श्री ||
" शुभ दीपावली "
..मोती साबण , नाजनीन अत्तर , राजकोट तेल आणि नवे कपडे
लहानपणीची नर्क चतुर्दशीची पहाट खूप रम्य होती. वर्षभर या दिवसाची वाट बघितलेली असायची . कारण इतक्या पहाटे संपूर्ण वर्षात कधी उठलेलो नसायचो. अगदी अंधार आहे तो पर्यंत घरचे जागं करायचे . रेडिओवर सनईचे सूर वाजत असायचे . वातावरणात सुखद गारवा असायचा . अंगणात आकाश दिव्याचा प्रकाश पसरलेला असायचा . बंबात पाणी तापत असायचं .
दार उघडून बाहेर बघितलं कि गल्लीतल्या घरांवर लावलेले आकाशदिवे प्रकाशमान झालेले असायचे . दारात झकास रांगोळी दिसायची. दूरवर कुठेतरी उडणाऱ्या फटाक्यांचे आवाज कानी यायचे . गल्लीतले माझे मित्र माझ्या आगोदर उठून फटाके उडवत असायचे . मग मी सुध्दा अंगात उत्साह संचारून आवरायला लागायचो. अंगातले कपडे काढून पाटावर बसलं कि अंगाला राजकोट तेल लागायचं. त्याचा तो नाकात बसलेला सुगंध शरीर रोमांचित करायचा . आमच्या घरात असणारं एक जुनं पुराण तांब्याचं घंगाळ समोर मांडलेलं असायचं. त्यातलं गरमागरम, पाणी अंगावर पडायचं. मग मोती साबण खोक्यातून बाहेर यायचा . मोती साबणाचा तो चिरपरिचित सुगंध नाकात शिरायचा . आंघोळ होऊन ओवाळण्याचा कार्यक्रम झाल्यावर अंगात नवे कपडे चढायचे. त्यावर नाझानिनचं अत्तर लावलं जायचं. मनगटावर आणि कानामागेही अत्तर लाऊन मी सज्ज व्हायचो. चहा पोटात ढकलून मी फटाक्यांचे बॉक्स घेऊन बाहेर धाव घ्यायचो.
सावंतांचा दीपक , तांबेलकरांचा आबा माझी वाट पाहत असायचे . त्यांच्याही अंगावर नवीन कपडे असायचे मग सगळे मिळून फटाके उडवायचो. अंधार आहे तो पर्यंत झाड , भुई चक्कर , भूसनळे असले आतीषबाजीचे प्रकार आम्ही उडवायचो. मग लवंगी फटाके, कनकावळे यांचा नंबर लागायचा . पहाटेच्या रम्य वातावरणात आमचा हा आतिश बाजीचा खेळ रंगायचा . उजाडू नये असे वाटत असतानाच फटफटायला लागायचं . फटकेही संपत आलेलेल असायचे . मग फुसक्या फटाकड्या गोळा करून आम्ही त्या उडवत बसायचो. जाळात दारू टाकून पेटवत बसायचो. फटके संपले कि फराळावर तुटून पडायचो. एव्हाना डोळ्यावर पेंग आलेली असायची . मग पुन्हा पांघरुणात शिरायचो . अश्या रीतीने नर्क चतुर्दशीची रम्य पहाट संपायची.
आता मन तसं भाऊन राहिलेलं नसल्यानं नर्क चतुर्दशीच्या पहाटेची पूर्वी प्रमाणे फारशी ओढ वाटत नाही . ते सवंगडी नाहीत , ती निष्पाप मनं नाहीत . मोती साबणाच्या पुडयावरचे मोतीही आता खूप फिक्कट छापलेले आहेत . पूर्वी एक टपोरा मोती खोक्याच्या मध्यभागी असायचा . तो दिसत नाही . मोती साबणाचा सुगंधही आता बदललाय . मी तरी पूर्वीचा कुठं राहिलोय ? ... असो कालाय तस्मै नम: ...
श्याम सावजी ... पंढरपूर

Thursday, October 10, 2019

अजून आठवे ती रात्र पावसाची

|| श्री ||
गेले दोन दिवस पंढरपुरात धुवाधार पाऊस पडतोय . तो ही नेमका रात्री . अगदी वेडया सारखा हा पाऊस काल कोसळत होता. मोठा आवाज करत . त्यात परवा लाईट गेल्या आणि मग आठवल्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या अश्या काही पावसाळी रात्री . त्या आठवणी देतोय ..
-----------------------------------------------------------------------------------
अजून आठवे ती रात्र पावसाची
काल रात्री  पावसाच्या काही जोरदार सरी पंढरपुरात बरसून गेल्या . वीज चमकतच होती आणि गडगडाट करत कोसळली सुद्धा . नेमकी घरातली सरकारी वीज गेली . आम्ही काही मित्र गप्पा मारत बसलो होतो . एक मित्र म्हणाला , " बाहेर असा पावसाचा गोंधळ , विजांचा कडकडाट सुरु असताना घरातली वीज गेली कि रात्र संपता संपत नाही " . मग आमच्या पावसाळी रात्री आलेले अनुभव सांगण्याच्या गप्पा रंगल्या .
अश्या कित्येक भयावह पावसाळी रात्री मी पण अनुभवल्या आहेत . आमचं जुनं घर धाब्याचं होतं , मातीचं माळवद असलेलं . पावसाळ्यापूर्वी माळवदावरचं गवत आम्ही खुरपी घेऊन खुरपायचो . जेणे करून पावसाळ्यात पाणी मुरून घर गळू नये म्हणून . पण तरीही पावसाळ्यात घर गळायचंच . दिवसा काही वाटायचं नाही पण रात्री त्यातल्या त्यात वीज गेल्यावर खूप भेसूर वाटायचं . सवन्यावरचे ( उजेडासाठी माळवदाला असणारा झरोका ) पत्रे जोरात वाजायचे . पत्रे उडून त्यावर ठेवलेले दगड घरात पडतील का काय अशी भीती वाटायची . कंदिलाच्या उजेडात आम्ही बसलेलो असायचो. कडकडणारी वीज आमच्या घरावर कोसळू नये म्हणून माझी आजी अंगणात लोखंडी पहार ठेवायची . लोखंडी पहारेला वीज का म्हणून भिते ? हे कोडं मला तेंव्हा पडायचं.
ढग गडगडतात तो आवाज म्हणजे एक चेटकीण म्हातारी आभाळात जात्यावर पीठ दळत बसलेली असते , तिच्या जात्याचा तो आवाज असतो अश्या कल्पना तेंव्हा डोक्यात आणि मनात घर करून बसलेल्या होत्या . ती म्हातारी त्या भयाण अंधारात डोळ्यासमोर यायची . मग झोपही लागायची नाही . कुठल्याना कुठल्या देवाचा धावा मनातल्या मनात करत मी रात्र लौकर संपू दे अशी विनवणी त्या देवाला करायचो. मधेच कधी तरी डोळा लागायचा आणि सकाळी जाग यायची तेंव्हा प्रसन्न असा तेजस्वी उजेड सगळीकडे पसरलेला असायचा . नव्या घरात राहायला जाई पर्यंत अश्या कित्येक भेसूर पावसाळी रात्री मी अनुभवल्या .
एकदा नौवी दहावीत असताना चित्रपट बघायला गेलो होतो . बाहेर तुफान पाऊस पडत होता . टोकिजच्या बाहेर आलो तर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं . कसाबसा सरकारी दवाखान्यापर्यंत आलो तर तिथली पुरुषभर उंचीची भदबदी (मोठा नाला ) भरून वाहत होती . माझ्या कंबरे इतके पाणी रस्त्यावर होते . सरकारी लाईट बंद होते . पाण्याला ओढही चांगली होती . झक मारली आणि सिनेमाला आलो असं वाटलं . एक दिशा धरून अंधारात पाण्यातून कसं बसं घर गाठलं.
विट्याला असताना एका नाटकाच्या तालमीसाठी एका खेडेगावकडे मी आणि आमचे दिग्दर्शक तात्या कोळी मिळून निघालो होतो . संध्याकाळी बस मधून उतरून पाऊल वाटेने त्या गावाकडे निघालो आणि पावसाला सुरुवात झाली . ओसाड माळा वर एक झाडा खाली मी आणि तात्या थांबलो . अंधार पडलेला होताच. विजा चमकायला लागल्या . त्यात तात्यांना आठवलं कि वीज नेमकी झाडावरच कोसळते . मग त्या झाडा खालून बाहेर पडून भर पावसात चालत राहिलो आणि गाव गाठलं
जाता जाता :-.. निसर्ग काय आणि माणूस काय .. नियंत्रणात आहेत तोपर्यंत दोघेही सुंदर , जिवलग वाटतात . मात्र एकदा नियंत्रणाबाहेर गेले कि त्यांचं भेसूर रूप जाणवून जातं.......
. श्याम सावजी
—

Monday, October 7, 2019

दसरा सण मोठा !


|| श्री ||
" दसरा सण मोठा " नावाचा एक धडा आम्हाला प्राथमिक शाळेत असताना होता . दस-या दिवशी मोरूला त्याचे वडील आज दसरा आहे म्हणून लौकर उठवतात आणि मोरू मग दसऱ्याचं महत्व विचारतो . मोरूचे वडील त्याला दस-याचे महत्व सांगतात असा तो धडा होता . खूप छान वाटायचे तो धडा वाचताना . खरं तर आपल्या मातीतले सगळेच सण आनंददायक असताना फक्त दसरा सण मोठा असे का म्हटले आहे ? असा प्रश्न पडायचा तेंव्हा . कदाचित नऊ दिवसांचा उपास संपल्याचा आनंद काही जणांना होत असावा . विनोदाचा भाग सोडला तर लहानपणी दस-याचा आनंद अभूतपूर्व असायचा . शाळेत पाटी पूजन असायचे , हे वेगळे शिवाय संध्याकाळी नवे कपडे घालून डोक्यावरच्या टोपीत घटाचा तुरा खोचून सिमोलंघनाला जायचे असल्याने ती उत्सुकता असायची.परतल्यावर गल्लीतल्या काही घरी मी पाया पडायला जायचो . मग तिथे कडकण्या खायला मिळायच्या .
कडकण्या वरून आठवलं. बाकी कश्यासाठी नवरात्र माझ्या लक्षात राहो न राहो या कडकण्यासाठी नक्कीच लक्षात राहील . कडकण्या हा माझा आवडता खाद्यपदार्थ . दोन तीन कप चहा आणि या भरपूर कडकन्या सकाळी पोटात गेल्या कि दिवस भर जेवण नाही मिळालं तरी चालेल .
पंढरपुरात सिमोलंघनासाठी दक्षिण दिशेला असणाऱ्या रिद्धी सिद्धी गणपतींना जायची प्रथा आहे . संध्याकाळ नंतर आख्ख पंढरपूर या रस्त्याला लोटलेलं असत . काही जणांच्या हातात पेटते पोत , दिवट्या , मशाली तर काही जणांच्या हातात शस्त्रे असतात . दस-याला संध्याकाळी आम्ही सिमोलंघनाला जाताना आधी रस्त्यातच लागणाऱ्या घाडग्यांच्या देवी मंदिरात जायचो . तिथे देवीची गाणी वगैरे व्हायची . कडाडून संबळ वाजायचा . भुते तल्लीन होऊन देवीचे गुणगान करायचे आणि मग त्या सर्वांसह आम्ही पुढे जायचो .
एक सीमोलंघन माझ्या चांगलंच लक्षात आहे . देवळातले कार्यक्रम उरकून आम्ही रिद्धीसिद्धीच्या रस्त्याला लागलो आणि तुफान पाऊस सुरु झाला . भक्तांची त्रेधा तिरपीट उडाली . भूत्यांच्या हातातले पोत आणि भक्तांच्या हातातल्या मशाली विझल्या . आम्हीही एका भिंतीच्या आडोश्याला पावसापासून बचाव करीत उभे राहिलो . आमच्या सोबत देवळातल्या पुजारीण बाई आक्का बाई होत्या त्या म्हणाल्या " आई कोपली " माझ्या बाल मनाला त्यांचं बोलण नीट समजलं नाही पण देवी खरंच कोपली असेल का असा प्रश्न मला त्या वेळी पडला होता . असो .
" दसरा उजाडला " नावाचं एक ग्रामीण नाटक पूर्वी खूप गाजलं होत . या नाटकाचे पंढरपुरातही प्रयोग झाल्याचं मी ऐकलं होत. पंढरपूरच्या कलाकारांबरोबरच सुर्यकांत , चंद्रकांत , आणि गुलाब मोकाशी असे नामांकित अभिनेते नट त्यात काम करायचे असं मी ऐकलं होत . मराठी चित्रपट सृष्टीतले नामांकित लेखक , दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी हे नाटक लिहिलेलं होत .
दस-याच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ! पुढच्या दस-या पर्यंत तुमचा आनंद द्विगुणित होत जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
जगदंब !
-
श्याम सावजी ................पंढरपूर

पंढरपूरच्या देवी .. ७




|| श्री ||
लखूबाई अर्थात दिंडीर वनातील रुक्मिणी आई 
पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेच्या काठावरच एका उंच चौथ-यावर हे लखुबाईचं मंदिर आहे . या भागाला पुराण काळात दिंडीर वन म्हणत होते असे सांगतात . लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोक नाव . रुक्मिणी दिंडीर वनात कशी आली याची एक आख्यायिका येथे सांगितली जाते . माता रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्ण एकांतात गप्पा मारत असताना राधेची हाक भगवंतांच्या कानावर आली . राधेच्या हाकेने भगवंत सैरभैर झाले . त्यांचं मन राधेकडे ओढ घेऊ लागलं. हे बघून रुक्मिणी मातेचा पारा चढला आणि ती रागारागाने तिथून निघाली . रुसलेली रुक्मिणी तडक दिंडीर वनात आली आणि तिथे लपून बसली . पाठोपाठ भगवान रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी दिंडीर वनात आले . येताना वाटेत त्यांची पुंडलीकाशी भेट झाली आणि पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर भगवान उभे राहिले ते श्री विठ्ठल म्हणून लोकमान्य झाले .
एका उंच दगडी चौथर्यावर हे लखू बाईचं मंदिर आहे . चंद्रभागा नदी काठावरची जवळपास सगळीच मंदिरं अशी उंच चौथर्यावर आहेत . पुराच्या दृष्टीने हि खबरदारी असावी . वन म्हणावं असं आता या भागात काही नाही . ना झाडी ना झुडूप . मंदिराच्या आसपास एक दोन झाडे शिल्लक आहेत हीच काय ती वनाची खुण . लखूबाईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे . लखूबाई च्या दर्शनाला महिलांची खूप गर्दी असते .
लखुबाइच्या पूजेने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख शांती राहते असे बोलले जाते . देवी मंदिराच्या कडेने प्रदक्षिणेसाठी असणारा मार्ग हा अगदीच चिंचोळा असल्याने आणि चौथरा उंच असल्याने प्रदक्षिणा मारताना मी लहानपणी खूप घाबरायचो . कित्येकदा मी प्रदक्षिणा अर्ध्यातून सोडून दिली . आता ग्रीलचे कठडे बसवल्याने प्रदक्षिणा मारणं सुखकर झालं आहे ........ श्याम सावजी .......पंढरपूर —

Sunday, October 6, 2019

पंढरपूरच्या देवी - ६





|| श्री ||
जुन्या अकलूज रोडची दुर्गा देवी
पद्मावती प्रमाणेच हि देवी सुद्धा टेकडीवर आहे . रानावनात , हिरव्यागार शेतीत हि टेकडी आहे . पंढरपूर सोडून दुसऱ्याचं कुठल्यातरी भागात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर वाटतं. अर्थात पंढरपूरपासून बरीच लांब जुन्या अकलूज रस्त्याला हे देवीचे मंदिर आहे.
या देवी बद्दल मला काही माहिती न्हवती . एकदा माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला या देवी बद्दल माहिती दिली आणि चला जायचं का ? असं विचारलं . नेमके ते नवरात्रीचे दिवस होते . मग त्यांच्या बरोबर पहिल्यांदा या देवीला आलो. पंढरपुरच्या वायव्य दिशेला हि देवी आहे . जुन्या अकलूज रोडला हे मंदिर लागतं . पंढरपूर पासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर असल्याने नेहमी या देवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या कमीच असेल पण नवरात्रीत हि टेकडी माणसांनी फुलून येते . आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि गावापासून दूर असल्याने आपण एखाद्या पर्यटन स्थळी आल्याचा भास होतो . या टेकडीच्या पायथ्याला एक ओढा आहे . इतर वेळी हा कोरडा असतो पण पावसाळ्यात याला पाणी येतं आणि मग हा परिसर खूप रमणीय दिसतो . इथं येणारे शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला आल्याप्रमाणे बरोबर खाद्य पदार्थ वगैरे घेऊन येतात व या टेकडीवर त्यांचा आस्वाद घेतात .
एका जाणकार व्यक्तीने अपत्यप्राप्तीसाठी आम्हा उभयतांना ११ रविवारी
राहू काळात दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्यास संगीतलं होतं. मला हि देवी आठवली .त्यानुसार आम्ही दर रविवारी राहू काळात या दुर्गा देवीच्या दर्शनाला जायचो . रविवारचा राहू काळ साडे चार ते सहा या वेळेत येतो . या काळात या मंदिरात देवीसमोर आम्ही दिवा लावायचो आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायचो. ११ रविवार झाल्यानंतर आम्ही या देवीला चांदीचा पाळणा अर्पण केला . आज दोन गोड मुलं आमच्या घरात रांगत आहेत. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. असो.
मावळतीला जाणारा सुर्य आणि त्याचे पसरलेले लालसर पिवळे ऊन यामुळे हि टेकडी आणि हा परिसर संध्याकाळच्या वेळी खूपच देखणा दिसतो . टेकडी आणि आजूबाजूची शेते या पिवळसर उन्हात न्हाऊन निघतात आणि निसर्गाची जादू आपल्या मनावर मोहिनी घालते .
" संधीकाली या अश्या धुंदल्या दिशा दिशा " अशी मनाची अवस्था होते . ...............
.श्याम सावजी ..........पंढरपूर

पंढरपूरच्या देवी - ५

|| श्री ||
कासेगाव शिवेवरची भुवनेश्वरी देवी
पंढरपूरच्या दक्षिणेला यमाई तुकाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्या नंतर मुख्य रस्ता सोडून आणखी एक कच्चा रस्ता कासेगावकडे जातो . या रस्त्याला बरोब्बर कासेगाव शिवेवर भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. येथून पुढे कासेगाव हद्द सुरु होते . पंढरपूरच्या रक्षणार्थ हि देवी पंढरपूर शिवेवर उभी असल्याचं सांगितलं जातं. यादेवीबद्धल फारशी माहिती किंवा दंत कथा मिळू शकली नाही मात्र हि देवी पंढरपूरकर आणि कासेगावकर या दोन्ही मंडळींमध्ये लोकप्रिय आहे. अगदी मोकळ्या माळावर असल्याप्रमाणे हे देवीचे मंदिर आहे. अगदी तुरळक घरे आजूबाजूला उभी आहेत. मंदिरात देवीच्या मुर्तीसामोराची दगडी चौकट काहीशी लहान असल्याने मूर्तीचे थोडे दुरूनच दर्शन होते.
भुवनेश्वरीचे दर्शन करून भाविक पुढे कासेगावच्या देवीच्या दर्शनाला जातात. येथेच देवी मंदिरा समोर शिवेवरच्या मारुतीचे मोठे मंदिर आहे ...
जगदंब....... ...................श्याम सावजी.. पंढरपूर