Monday, April 8, 2019

पहिलीतल्या मैत्रिणीची रम्य भेट


|| श्री ||

मार्च महिना हा तसा अचानक कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा. हा अवकाळी पाउस अचानक कोसळतो आणि रम्य अनुभूती देऊन जातो. यंदा अजून पर्यंत तरी अवकाळी पाउस पंढरपुरात कोसळलेला नाही. पण माझ्या मनावर मात्र रम्य आठवणींचा पाऊस परवा कोसळून गेला. निमित्त झालं ते माझी इयत्ता पहिलीतली मैत्रीण मला भेटायला आल्याचं. या माझ्या शिशु विहार मधल्या मैत्रिणीची धाकटी बहिण माझ्या पत्नीच्या वर्गातली. ती माझ्या सौ.आणि आमच्या चिरंजीवांना बघायला घरी आली. तिच्याबरोबर तिची ही थोरली बहिण आमच्या घरी आली. घरी आल्या बरोब्बर तिनं माझ्या बायकोला सांगून टाकलं ,
मी तुला भेटायला आलेली नाही . श्याम सावजी तुझा नवरा आहे हे समजल्यावर त्याला भेटायला आलेय. मला हे अनपेक्षित होतं पण तिचा तो रोखठोक मोकळा स्वभाव बघून बरं वाटलं. मग आमच्या त्या इयत्ता पहिली दुसरीच्या दिवसातल्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेचे दिवस पुन्हा जागे झाले. मग मी माझ्या जवळ असणारा शाळेतला त्या दिवसांचा आमच्या वर्गाचा एकत्रित फोटो तिला दाखवला आणि तिलाच विचारलं ,
ओळख तू यात कुठं आहे ते ? ”
तिला सांगता येईना . माझ्या मात्र ती तेंव्हाची लक्षात होती. मी तिला ती फोटोत कुठं आहे ते दाखवलं.
अरेच्चा . ही मी का ? .अच्छा .. तू मला आठवतो आहेस तेंव्हाचा
ती कुतूहलानं स्वत:ला बघत बसली. ती अजूनही तशीच साधी , खेळकर वाटत होती. मी फक्त दोन वर्षे तिच्या वर्गात होतो. नंतर मी शाळा बदलली. त्या नंतर आम्ही कधीच एकमेकांसमोर आलो नाही. एकत्र एका वर्गात आलो नाही . पण या दोन वर्षात तिच्या वर्गात असणारा मी तिला आठवत होतो आणि अगदी मोकळेपणाने ४० पेक्षा जास्त वर्षांनी ती आमच्या घरी मला भेटायला आली ही माझ्यासाठी खूपच आनंददायक घटना होती. शाळेच्या दिवसातल्या आठवणींना उजाळा देऊन ती आमचा निरोप घेऊन निघून गेली. आमच्या अंगणातल्या चाफ्याची फुले अलगद उमलली आणि एक हलकी अवकाळीची सर त्या रात्री पंढरपुरात बरसून गेली.... .... श्याम सावजी.. पंढरपूर

11 comments:

  1. प्रतिक्रिया नक्की द्या

    ReplyDelete
    Replies
    1. आमच्या अंगणातल्या चाफ्याची फुले अलगद उमलली आणि एक हलकी अवकाळीची सर त्या रात्री पंढरपुरात बरसून गेली

      Delete
    2. खूप खूप आभार माळी साहेब

      Delete
  2. रखरखत्या उन्हात एक हळुवार झुळक यावी आणी तीच्या शीतल हवेने सर्व मोहरुन जावे !
    छान आठवण धन्यवाद, शाम पंढरपुरी !!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद जयंत भाऊ .. आनंद वाटला

      Delete
  3. सर्वप्रथम अभिनंदन श्यामराव, आपण ब्लाॅगर झालात हि माझ्यासारख्या तुमच्या बालमित्रासाठि अत्यंत आनंदाची गोष्ट. लेखन नेहमीप्रमाणे सुंदरच. अशा चाफेकळी झुळुकि आमच्यापर्यंत पॊहॊचवत रहा. आपलं लेखन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी पावॊ हिच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना. पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    संजीव बहिरट आणि परिवार, पंढरपूर

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभार संजीव भाऊ . खूप आनंद वाटला .. असेच प्रेम राहू द्यात

      Delete
  4. ब्लॉगर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, श्याम !

    सुंदर ब्लॉग आहे !
    खुसखुशीत लेखन वाचून मजा आली !
    बालपणीच्या अलवार आठवणी ताज्या करणारे बालमित्र !
    वाह क्या बात हैं ।

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आनंद वाटला भाग्येश भाऊ .. असाच पाठीशी रहा

      Delete
  5. ती जरी निघुन गेली तरी
    तीच्या आठवणींची तुंम्हा साथ आहे,
    मंद मंद चाफ्याच्या सुगंधाची
    येणारी प्रतेक रात आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. वा वा वा ईश्वर भाऊ मजा आला. क्या बात है.. सुंदर .. तुम्ही पण लवकरच लिखाणाला सुरुवात करावी hi इच्छा

      Delete