|| श्री ||
जुन्या अकलूज रोडची दुर्गा देवी
पद्मावती प्रमाणेच हि देवी सुद्धा टेकडीवर आहे . रानावनात , हिरव्यागार शेतीत हि टेकडी आहे . पंढरपूर सोडून दुसऱ्याचं कुठल्यातरी भागात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर वाटतं. अर्थात पंढरपूरपासून बरीच लांब जुन्या अकलूज रस्त्याला हे देवीचे मंदिर आहे.
या देवी बद्दल मला काही माहिती न्हवती . एकदा माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला या देवी बद्दल माहिती दिली आणि चला जायचं का ? असं विचारलं . नेमके ते नवरात्रीचे दिवस होते . मग त्यांच्या बरोबर पहिल्यांदा या देवीला आलो. पंढरपुरच्या वायव्य दिशेला हि देवी आहे . जुन्या अकलूज रोडला हे मंदिर लागतं . पंढरपूर पासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर असल्याने नेहमी या देवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या कमीच असेल पण नवरात्रीत हि टेकडी माणसांनी फुलून येते . आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि गावापासून दूर असल्याने आपण एखाद्या पर्यटन स्थळी आल्याचा भास होतो . या टेकडीच्या पायथ्याला एक ओढा आहे . इतर वेळी हा कोरडा असतो पण पावसाळ्यात याला पाणी येतं आणि मग हा परिसर खूप रमणीय दिसतो . इथं येणारे शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला आल्याप्रमाणे बरोबर खाद्य पदार्थ वगैरे घेऊन येतात व या टेकडीवर त्यांचा आस्वाद घेतात .
एका जाणकार व्यक्तीने अपत्यप्राप्तीसाठी आम्हा उभयतांना ११ रविवारी राहू काळात दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्यास संगीतलं होतं. मला हि देवी आठवली .त्यानुसार आम्ही दर रविवारी राहू काळात या दुर्गा देवीच्या दर्शनाला जायचो . रविवारचा राहू काळ साडे चार ते सहा या वेळेत येतो . या काळात या मंदिरात देवीसमोर आम्ही दिवा लावायचो आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायचो. ११ रविवार झाल्यानंतर आम्ही या देवीला चांदीचा पाळणा अर्पण केला . आज दोन गोड मुलं आमच्या घरात रांगत आहेत. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. असो.
मावळतीला जाणारा सुर्य आणि त्याचे पसरलेले लालसर पिवळे ऊन यामुळे हि टेकडी आणि हा परिसर संध्याकाळच्या वेळी खूपच देखणा दिसतो . टेकडी आणि आजूबाजूची शेते या पिवळसर उन्हात न्हाऊन निघतात आणि निसर्गाची जादू आपल्या मनावर मोहिनी घालते . " संधीकाली या अश्या धुंदल्या दिशा दिशा " अशी मनाची अवस्था होते . ...............
.श्याम सावजी ..........पंढरपूर
No comments:
Post a Comment