Saturday, October 5, 2019

पंढरपुरातील देवी दर्शन - ३


यमाई तुकाई
(
ये माई तू का आली ?)
पंढरपूरच्या दक्षिणेला सांगोला रोडला यमाई तुकाईचे मंदिर आहे . उत्तरेकडे तोंड करून असलेल्या या साध्या सुध्या मंदिरात दोन तांदळे आहेत . यांना यमाई आणि तुकाई असे म्हणतात . पंढरपुरातील हे महत्वाचं आणि प्रसिद्ध देवी मंदिर आहे . नवरात्रीत तर या मंदिरात गर्दी असतेच पण मंगळवार , शुक्रवार या देवीच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पूर्वी गावापासून काहीसे बाहेर आणि लांब ओसाड माळावर असे हे मंदिर असल्याने या देवीच्या दर्शनाला येताना भाविक पूर्वी हमखास टांग्याचा वापर करत. काही श्रद्धाळू भाविक तेंव्हाही चालत येत आणि आजही येतात. आता पंढरपूर या मंदिराच्याही पुढे पसरले आहे. इथून जवळच जिल्हा न्यायालयाची इमारत झाल्याने मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ असते.
या देवीची अख्याइका पुढील प्रमाणे सांगतात .
रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर राम आणि लक्ष्मण या भागातून सीतेचा शोध घेत जात होते . राम खुपच शोकमग्न अवस्थेत होते . हे पार्वती मातेनं बघितलं आणि भगवान शंकरांना विचारलं , " रामाचा हा शोक खरा आहे का ? रामाला शांत कोण करणार ? " भगवान शंकर म्हणाले , " रामाला शांत करणं मला जमणार नाही . तू प्रयत्न करून बघ . " श्री रामाची परीक्षा घेण्याच्या हेतूनं पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केले आणि त्या श्री रामा समोर आल्या . मात्र श्री रामांनी सीता रूपातल्या पार्वती मातेला ओळखलं आणि तिला प्रश्न केला , " ये माई तू का आली ? " रामाने आपल्याला ओळखल्याचे बघताच पार्वती माता अदृश्य झाल्या त्या याचं ठिकाणी .
हे दोन तांदळे म्हणजे पार्वती माता आणि त्यांचे सीता रूप आहेत आणि ये माई .. तू का आली ? चा अपभ्रंश झाला यमाई तुकाई ... येथून जवळच पद्मावतीचे तळे आहे . यमाई तुकाईला आल्या नंतर भाविक येथून जवळच असणाऱ्या भूवनेश्वरीच्या दर्शनाला जातात तर काही जण आणखी पुढे जात कासेगावाच्या प्रसिद्ध देवीचेही दर्शन घेतात . भुवनेश्वरी देवी कासेगाव शिवेवर आहे . ..... श्याम सावजी ..... पंढरपूर

No comments:

Post a Comment