|| श्री ||
लखूबाई अर्थात दिंडीर वनातील रुक्मिणी आई
पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेच्या काठावरच एका उंच चौथ-यावर हे लखुबाईचं मंदिर आहे . या भागाला पुराण काळात दिंडीर वन म्हणत होते असे सांगतात . लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोक नाव . रुक्मिणी दिंडीर वनात कशी आली याची एक आख्यायिका येथे सांगितली जाते . माता रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्ण एकांतात गप्पा मारत असताना राधेची हाक भगवंतांच्या कानावर आली . राधेच्या हाकेने भगवंत सैरभैर झाले . त्यांचं मन राधेकडे ओढ घेऊ लागलं. हे बघून रुक्मिणी मातेचा पारा चढला आणि ती रागारागाने तिथून निघाली . रुसलेली रुक्मिणी तडक दिंडीर वनात आली आणि तिथे लपून बसली . पाठोपाठ भगवान रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी दिंडीर वनात आले . येताना वाटेत त्यांची पुंडलीकाशी भेट झाली आणि पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर भगवान उभे राहिले ते श्री विठ्ठल म्हणून लोकमान्य झाले .
एका उंच दगडी चौथर्यावर हे लखू बाईचं मंदिर आहे . चंद्रभागा नदी काठावरची जवळपास सगळीच मंदिरं अशी उंच चौथर्यावर आहेत . पुराच्या दृष्टीने हि खबरदारी असावी . वन म्हणावं असं आता या भागात काही नाही . ना झाडी ना झुडूप . मंदिराच्या आसपास एक दोन झाडे शिल्लक आहेत हीच काय ती वनाची खुण . लखूबाईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे . लखूबाई च्या दर्शनाला महिलांची खूप गर्दी असते . लखुबाइच्या पूजेने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख शांती राहते असे बोलले जाते . देवी मंदिराच्या कडेने प्रदक्षिणेसाठी असणारा मार्ग हा अगदीच चिंचोळा असल्याने आणि चौथरा उंच असल्याने प्रदक्षिणा मारताना मी लहानपणी खूप घाबरायचो . कित्येकदा मी प्रदक्षिणा अर्ध्यातून सोडून दिली . आता ग्रीलचे कठडे बसवल्याने प्रदक्षिणा मारणं सुखकर झालं आहे ........ श्याम सावजी .......पंढरपूर —
No comments:
Post a Comment