|| श्री ||
" दसरा सण मोठा " नावाचा एक धडा आम्हाला प्राथमिक शाळेत असताना होता . दस-या दिवशी मोरूला त्याचे वडील आज दसरा आहे म्हणून लौकर उठवतात आणि मोरू मग दसऱ्याचं महत्व विचारतो . मोरूचे वडील त्याला दस-याचे महत्व सांगतात असा तो धडा होता . खूप छान वाटायचे तो धडा वाचताना . खरं तर आपल्या मातीतले सगळेच सण आनंददायक असताना फक्त दसरा सण मोठा असे का म्हटले आहे ? असा प्रश्न पडायचा तेंव्हा . कदाचित नऊ दिवसांचा उपास संपल्याचा आनंद काही जणांना होत असावा . विनोदाचा भाग सोडला तर लहानपणी दस-याचा आनंद अभूतपूर्व असायचा . शाळेत पाटी पूजन असायचे , हे वेगळे शिवाय संध्याकाळी नवे कपडे घालून डोक्यावरच्या टोपीत घटाचा तुरा खोचून सिमोलंघनाला जायचे असल्याने ती उत्सुकता असायची.परतल्यावर गल्लीतल्या काही घरी मी पाया पडायला जायचो . मग तिथे कडकण्या खायला मिळायच्या .
कडकण्या वरून आठवलं. बाकी कश्यासाठी नवरात्र माझ्या लक्षात राहो न राहो या कडकण्यासाठी नक्कीच लक्षात राहील . कडकण्या हा माझा आवडता खाद्यपदार्थ . दोन तीन कप चहा आणि या भरपूर कडकन्या सकाळी पोटात गेल्या कि दिवस भर जेवण नाही मिळालं तरी चालेल .
पंढरपुरात सिमोलंघनासाठी दक्षिण दिशेला असणाऱ्या रिद्धी सिद्धी गणपतींना जायची प्रथा आहे . संध्याकाळ नंतर आख्ख पंढरपूर या रस्त्याला लोटलेलं असत . काही जणांच्या हातात पेटते पोत , दिवट्या , मशाली तर काही जणांच्या हातात शस्त्रे असतात . दस-याला संध्याकाळी आम्ही सिमोलंघनाला जाताना आधी रस्त्यातच लागणाऱ्या घाडग्यांच्या देवी मंदिरात जायचो . तिथे देवीची गाणी वगैरे व्हायची . कडाडून संबळ वाजायचा . भुते तल्लीन होऊन देवीचे गुणगान करायचे आणि मग त्या सर्वांसह आम्ही पुढे जायचो .
एक सीमोलंघन माझ्या चांगलंच लक्षात आहे . देवळातले कार्यक्रम उरकून आम्ही रिद्धीसिद्धीच्या रस्त्याला लागलो आणि तुफान पाऊस सुरु झाला . भक्तांची त्रेधा तिरपीट उडाली . भूत्यांच्या हातातले पोत आणि भक्तांच्या हातातल्या मशाली विझल्या . आम्हीही एका भिंतीच्या आडोश्याला पावसापासून बचाव करीत उभे राहिलो . आमच्या सोबत देवळातल्या पुजारीण बाई आक्का बाई होत्या त्या म्हणाल्या " आई कोपली " माझ्या बाल मनाला त्यांचं बोलण नीट समजलं नाही पण देवी खरंच कोपली असेल का असा प्रश्न मला त्या वेळी पडला होता . असो .
" दसरा उजाडला " नावाचं एक ग्रामीण नाटक पूर्वी खूप गाजलं होत . या नाटकाचे पंढरपुरातही प्रयोग झाल्याचं मी ऐकलं होत. पंढरपूरच्या कलाकारांबरोबरच सुर्यकांत , चंद्रकांत , आणि गुलाब मोकाशी असे नामांकित अभिनेते नट त्यात काम करायचे असं मी ऐकलं होत . मराठी चित्रपट सृष्टीतले नामांकित लेखक , दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी हे नाटक लिहिलेलं होत .
दस-याच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ! पुढच्या दस-या पर्यंत तुमचा आनंद द्विगुणित होत जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना ! जगदंब !
- श्याम सावजी ................पंढरपूर
No comments:
Post a Comment