|| श्री ||
" शुभ दीपावली "
..मोती साबण , नाजनीन अत्तर , राजकोट तेल आणि नवे कपडे
लहानपणीची नर्क चतुर्दशीची पहाट खूप रम्य होती. वर्षभर या दिवसाची वाट बघितलेली असायची . कारण इतक्या पहाटे संपूर्ण वर्षात कधी उठलेलो नसायचो. अगदी अंधार आहे तो पर्यंत घरचे जागं करायचे . रेडिओवर सनईचे सूर वाजत असायचे . वातावरणात सुखद गारवा असायचा . अंगणात आकाश दिव्याचा प्रकाश पसरलेला असायचा . बंबात पाणी तापत असायचं .
दार उघडून बाहेर बघितलं कि गल्लीतल्या घरांवर लावलेले आकाशदिवे प्रकाशमान झालेले असायचे . दारात झकास रांगोळी दिसायची. दूरवर कुठेतरी उडणाऱ्या फटाक्यांचे आवाज कानी यायचे . गल्लीतले माझे मित्र माझ्या आगोदर उठून फटाके उडवत असायचे . मग मी सुध्दा अंगात उत्साह संचारून आवरायला लागायचो. अंगातले कपडे काढून पाटावर बसलं कि अंगाला राजकोट तेल लागायचं. त्याचा तो नाकात बसलेला सुगंध शरीर रोमांचित करायचा . आमच्या घरात असणारं एक जुनं पुराण तांब्याचं घंगाळ समोर मांडलेलं असायचं. त्यातलं गरमागरम, पाणी अंगावर पडायचं. मग मोती साबण खोक्यातून बाहेर यायचा . मोती साबणाचा तो चिरपरिचित सुगंध नाकात शिरायचा . आंघोळ होऊन ओवाळण्याचा कार्यक्रम झाल्यावर अंगात नवे कपडे चढायचे. त्यावर नाझानिनचं अत्तर लावलं जायचं. मनगटावर आणि कानामागेही अत्तर लाऊन मी सज्ज व्हायचो. चहा पोटात ढकलून मी फटाक्यांचे बॉक्स घेऊन बाहेर धाव घ्यायचो.
सावंतांचा दीपक , तांबेलकरांचा आबा माझी वाट पाहत असायचे . त्यांच्याही अंगावर नवीन कपडे असायचे मग सगळे मिळून फटाके उडवायचो. अंधार आहे तो पर्यंत झाड , भुई चक्कर , भूसनळे असले आतीषबाजीचे प्रकार आम्ही उडवायचो. मग लवंगी फटाके, कनकावळे यांचा नंबर लागायचा . पहाटेच्या रम्य वातावरणात आमचा हा आतिश बाजीचा खेळ रंगायचा . उजाडू नये असे वाटत असतानाच फटफटायला लागायचं . फटकेही संपत आलेलेल असायचे . मग फुसक्या फटाकड्या गोळा करून आम्ही त्या उडवत बसायचो. जाळात दारू टाकून पेटवत बसायचो. फटके संपले कि फराळावर तुटून पडायचो. एव्हाना डोळ्यावर पेंग आलेली असायची . मग पुन्हा पांघरुणात शिरायचो . अश्या रीतीने नर्क चतुर्दशीची रम्य पहाट संपायची.
आता मन तसं भाऊन राहिलेलं नसल्यानं नर्क चतुर्दशीच्या पहाटेची पूर्वी प्रमाणे फारशी ओढ वाटत नाही . ते सवंगडी नाहीत , ती निष्पाप मनं नाहीत . मोती साबणाच्या पुडयावरचे मोतीही आता खूप फिक्कट छापलेले आहेत . पूर्वी एक टपोरा मोती खोक्याच्या मध्यभागी असायचा . तो दिसत नाही . मोती साबणाचा सुगंधही आता बदललाय . मी तरी पूर्वीचा कुठं राहिलोय ? ... असो कालाय तस्मै नम: ... श्याम सावजी ... पंढरपूर