|| श्री ||
मे महिना आता निम्यापेक्षा
जास्त संपलाय. उकाडा तसाच आहे. अवकाळी अजून पडलेला नाही. आता घरोघरी कुलर / एसी
झालेले असल्याने घर, खोली गारेगार करून सर्वजण रात्री सुखाने झोपत असतील. पण काही
वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी कुलर, एसी अश्या प्रकारांचं प्रस्थ माजलेलं
नव्हतं तेंव्हा नैसर्गिक वाऱ्यासाठी माळवदावर झोपायला जाणे हा मे महिन्यातला एक रम्य
उपक्रम असायचा. आता माळवद संस्कृती कमी झालेली असल्याने हे सुख खूप कमी लोकांच्या
वाट्याला येत असणार. माझ्या लहानपणी मात्र मे महिन्याच्या सुट्या लागल्या की लगेच
आम्हाला माळवदावर झोपायला जाण्याचे वेध लागायचे. संध्याकाळी ५ , ६ वाजण्याच्या
सुमारास आगोदर माळवदावर थोडे पाणी मारले जायचे. जेणेकरून तापलेले मातीचे माळवद थंड
व्हावे. मातीचा गंध सगळीकडे पसरायचा. अंथरून , पांघरून आगोदरच माळवदावर आणून
ठेवलेले असायचे. रात्री घरातली जेवणे वगैरे झाल्यावर मग सगळे माळवदाकडे कूच करायचे.
साधारण १०.. साडे दहा वाजलेले असायचे. रेडीओवरची
आपली आवड नुकतीच संपलेली असायची. आमच्या घरातला एक जुनाट कंदील प्रज्वलीत करून
आम्ही आमच्या सोबत माळवदावर न्यायचो. त्या उजेडात माळवद आणि आसपासचा परिसर गूढ
भासायचा. आमच्या घराच्या उत्त्तर आणि दक्षिण बाजूला तीन माजली इमारती असल्याने या
बाजूने आमचे माळवद बंदिस्त होते. पश्चिम दिशेला रस्ता आणि त्या समोर लोकमान्य
विद्यालयाची उंच दगडी भव्य इमारत होती. इमारतीच्या आतून कौलांच्या वर आलेला पिंपळ
कायम सळसळत असायचा. आमच्या माळवदाची पूर्व बाजू मात्र चांगली मोकळी ढाकळी होती. गाडगे
महाराज मठाचा एक कोपरा सोडला तर या बाजूला सगळ्या आमच्या घरासारख्या एकमजली इमारती
असल्याने अगदी जुन्या पेठेच्या पुढचा म्हणजे अरुण थिएटर पर्यंतचा नजारा दिसायचा.
जुन्या पेठेतल्या मठांवरच्या भगव्या पताका, त्या भागातली झाडी सगळे सगळे.
आमच्या दक्षिणेकडील इमारतीच्या
भिंतीने आणि पूर्वेकडील थोडा भाग व्यापलेल्या मठाच्या भिंतीमुळे माळवदाचा आग्नेय
कोपरा खूपच अंधारा झालेला होता. या कोपऱ्याकडे बघायलाही मी तेंव्हा दिवसापण
घाबरायचो.. रात्री तर विचारूच नका. त्यात माझ्या आज्जीने आम्ही लहान मुलांसमोर
उगीच एक काल्पनिक कथा पसरवून ठेवली होती. ती अशी की , एकदा माझी आज्जी अचानक
रात्री कसल्यातरी आवाजाने जागी झाली तर घुंगरांचा आवाज येत होता. आज्जीने हळूच
बघितलं तर माळवदाच्या त्या अग्नेय अंधाऱ्या कोपऱ्यातून एक केस मोकळे सोडलेली
स्त्री आमच्या माळवदाच्या पश्चिम बाजूकडे चालत गेली. तिच्या पायातील घुंगरू छम छम
वाजत होते....... ( क्रमश:)
................श्याम सावजी... पंढरपूर
Hahaha mastach
ReplyDelete.... Pudhcha blog post Kara lawkar
नक्कीच भाऊ .. शक्यतो उद्याच पोस्ट करतो.. धन्यवाद :)
Delete