Tuesday, May 7, 2019

सांडगे ,शेवया आणि उन्हाळी सुट्ट्या




|| श्री ||

उन्हाळी सुट्टीतली महिलांची कामं हा एक खुपच आकर्षक आणि देखणा सोहळा आमच्या घरी बघायला मिळायचा . तसा तो सर्वच घरी पूर्वी बघायला मिळायचा . आजही काही घरांनी आपलं हे उन्हाळी कौशल्य जपलेलं आहे . 
दुपारच्या वेळी आमच्या घरी गल्लीतल्या महिला जमायच्या आणि मग आमच्या आज्जीच्या मार्गदर्शनाखाली त्या सगळ्या शेवया तयार करायला सुरुवात करायच्या . पाट वगैरे लावले जायचे . शेवयासाठीची मऊ सुत कणिक मळून तयार असायची आणि मग सुरु व्हायचा एक देखणा अविष्कार . त्या मळलेल्या कणकेतून शेवयाच्या नाजूक नाजूक तारा बाहेर पडायला सुरुवात व्हायची . त्या सर्वच महिलांचे शेवया बनवण्यातले कौशल्य आचंबित करणारे असायचे . शेवयाची तार न तुटू देता त्या महिला इतक्या वेगाने शेवया बनवायच्या कि थक्क व्हायला व्हायचं. हे सर्व बघत मी एका बाजूला एखादे पुस्तक वाचत किंवा चित्रे काढत बसलेला असायचो . पण माझे बहुतेक लक्ष या सुतासारख्या बनणाऱ्या शेवयांकडे असायचं . नंतर हे बनवलेल्या शेवयांचे पुंजके एका लांब वेळूवर वाळवण्यासाठी अडकवले जायचे . 
सांडगे हाही खाद्य प्रकार मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत असाच बनवला जात असताना मी बघायचो . बनवलेले सांडगे असलेले पाट माळवदावर नेउन ठेवायला आम्हा मुलांची खूप गडबड उडायची . सांडगे वाळल्यानंतर ते नुसतेच खायला पण मज्जा यायची . कुरोड्या , पापड्या असे पदार्थही उन्हाळी सुट्टीत घरी बनायचे . दुपारच्या वेळी हे पदार्थ घरातील आणि गल्लीतील महिला बनवत असताना ते दृश्य खूप आनंददाई असायचं . हे सर्व सुरु असताना आमच्या घरातील रेडिओवर दुपारी वनिता मंडळ सुरु असायचं . त्यावरची सुरेल गाणी वातावरण आणखी सुंदर बनवायची . या उन्हाळी कामांमुळे उन्हाळ्याची सुट्टी बहरून जायची. तापलेली दुपार रम्य वाटायची. आता उन्हाळी कामांचे हे रम्य चित्र दिसणारा भाग्यवान म्हणायला हवा. 
परवा आमच्या वाड्यातील महिलांनी हा उन्हाळी कामाचा डाव पुन्हा मांडला आणि मी जुन्या आठवणीत पुन्हा गेलो . दर उन्हाळा सुट्टीत मला हा शेवया , सांडगे बनवण्याचा आमच्या घरातला प्रसंग आठवतो , ते वनिता मंडळाचे सूर कानात घुमायला लागतात . नाजूक नाजूक शेवया वळणारे हात दिसायला लागतात . त्यांच्या त्या गप्पा टप्पा आठवतात आणि मन पुन्हा भूतकाळात जाण्यासाठी धडपडायला लागतं ..... श्याम सावजी ...... पंढरपूर 

No comments:

Post a Comment