Tuesday, April 23, 2019

पुस्तकांची आनंदी संगत


|| श्री ||

आज जागतिक पुस्तक दिन असल्याचं खूपच उशिरा समजलं. ( या जागतिक दिनांची यादी कुठे मिळते का हो ? ) तर असो. मग मनातल्या पुस्तक प्रेमाने उचल खाल्ली आणि लिहायला बसलो. पुस्तक वाचन हा माझा एकेकाळचा अत्यंत आवडता छंद . पुस्तक वाचनापासून ते पुस्तक लिखाणा पर्यन्तचा माझा प्रवास थोडक्यात उलगडतो. 
वाचनाची आवड त्या दिवसात इतकी होती कि बसल्या बैठकीला जाडजूड पुस्तक वाचून केंव्हा संपलं ते त्या दिवसात कळायचं नाही . मला आठवतंय , मी ३ री ४ थीत असेन . एक गृहस्थ सायकलीला मोठ्ठी पिशवी टांगून आमच्या घरी यायचे . त्यांच्या त्या पिशवीत कादंबऱ्या , रहस्य कथा वगैरे पुस्तके असायची .मग माझी आई त्यातून निवडून पुस्तके घ्यायची . माझ्या साठीही बिरबल , चांदोबा , हतीम ताई , अलिबाबा अश्या पुस्तकांची मागणी व्हायची . ती पुस्तके देऊन तो गृहस्थ निघून जायचा . गौरवार हे त्या गृहस्थाचं नावही मला चांगला स्पष्ट आठवतंय हे माझ्या बघण्यातल पाहिलं फिरतं वाचनालय . २ ते ३ वर्षे हे गृहस्थ आमच्या घरी ते त्यांचे फिरते वाचनालय घेऊन यायचे . परी कथा , चांदोबा वाचून कंटाळल्यावर मी रहस्य कथांकडे वळलो . बाबुराव अर्नाळकर , गुरुनाथ नाईक अश्या नामवंत लेखकांच्या रहस्य कथा वाचण्याचा छंदच जडला आणि ह्या कथा वाचून मग आजूबाजूला सगळीकडे रहस्येच दिसायला लागायची . त्याच वेळेला भा. रा. भागवतांचा बन्या उर्फ फास्टर फेणे ही आवडायला लागला . इतका कि तो काल्पनिक आहे हे सत्य पचवायला जड जाऊ लागले . असं वाटायचं कि त्याला जाऊन कधीतरी भेटलेच पाहिजे . त्याच बरोबरीने वेताळाच्या कॉमिक्स कथा खूप आवडायच्या . चि .वी. जोशींचे चिमणराव गुंड्याभाऊ पण मनाला खूप भावले होते . माझी ठाण्याला राहणारी मावशी तिकडून किशोर , कुमार , आनंद , चंपक अशी पुस्तके पार्सलने पाठवायची . तेंव्हा पंढरपुरात चांगलं पुस्तकांचं दुकान असं न्हवत . तेंडूलकरांचं एकमेव दुकान आमच्यासाठी वरदान होत . रहस्य कथा वाचून मी हि तेंव्हा तश्या कथा लिहिण्याचा केलेला प्रयत्न मला आठवतोय . त्याच प्रमाणे गल्लीत राहणाऱ्या अंजू वैद्यने आणि मी मिळून कुठून कुठून गोळा केलेले विनोद , चित्रे , कविता यांचे हस्तलिखित एकत्र करून ते आमच्या मित्रांपुरत प्रकाशित केलं होतं. 
महाविद्यालीन जीवनात प्रवेश केल्या नंतर विट्याला शिक्षणासाठी असताना तिथल्या वाचनालयात व्यंकटेश माडगुळकरांचे " करुणाष्टक " वाचनात आले . माझ्या माहिती प्रमाणे हे मी वाचलेले पहिले संपन्न ललित लिखाण . त्यानंतर मग अश्या वैचारिक , ललित लिखाणांची ओढच लागली . याच वेळी वसंत सबनीसांची पुस्तके हि वाचनात आली . त्यांचे " बन्या बापू "मला खूपच आवडले इतके कि त्या आधारानेच मी माझी पहिली कथा " मी लाच घेतो " लिहिली ( १९८८मध्ये ) आणि गम्मत म्हणजे त्याच वर्षी ती " बुलंद " या दिवाळी अंकात छापूनही आली . म्हणजे माझ्या लिखाणाची प्रेरणा सबनीस आहेत असे म्हणायला हरकत नाही .जयवंत दळवींची " महानंदा " हि कादंबरी पण अशीच मनाला भावली होती . जणू त्या महानंदेच्या मी तेंव्हा प्रेमात पडलो होतो . त्यानंतर व पु काळे , माडगुळकर . शंकरराव खरात , द मा मिरासदार , अण्णा भाऊ साठे , गो नि दांडेकर , पु ल देशपांडे , अत्रे , जी ए कुलकर्णी अश्या नामवंतांची पुस्तके वाचण्याचा नादच लागला . तो आज पर्यंत . कालानुरूप मी सुध्धा लिखाण करत गेलो . वेगवेगळ्या दिवाळी अंकातून त्या कथा कविता प्रसिध्ध झाल्या . काही एकांकिका लिहिल्या आणि त्याचे प्रयोग केले . कथाकथनाचे हि अनेक ठिकाणी प्रयोग केले . 
गेल्या वर्षी अचानक माझं एक स्वलिखित पुस्तक ( कथासंग्रह ) बाजारात आला . भंगार वाडा हे त्या पुस्तकाचं नाव . आमच्या वाड्यात चार ते पाच कुटुंबे गुण्या गोविंदाने , हसून खेळून नांदतात . हे आमच्या मधले भावबंध , आपुलकी , हसरा खेळकर पणा मी या कथा संग्रहात मांडलाय . अर्थात थोडी रहस्य आणि विनोदाची काल्पनिक फोडणी देऊन .आणखी चार पुस्तकाचं लिखाण तयार आहे . बघुयात कधी योग येतोय ते 
पण हे सगळे शक्य झाले ते वाचनामुळे . पुस्तकांनी माझं जगणं समृद्ध केलं . अजूनही ते समृद्ध होतंच आहे . जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
........श्याम सावजी ......पंढरपूर

Friday, April 19, 2019

आनंदाची ठेव


|| श्री ||
 व्यापारी कामेटीचा छबिना...
अगदी कळत्या वयापासून हा हनुमान जयंती निमित्त पंढरपुरातून निघणारा व्यापारी कमेटीचा छबिना मी बघत आलो आहे . अगदी लहानपणी आज्जीचं बोट धरून मी हा छबिना बघायला जायचो. आजही मी हा छबिना बघायला आवर्जून जातो . नाही गेलो किंवा काही कारणानं जायला जमलं नाही तर अगदी मोठा गुन्हा केल्यासारखं वाटतं. हा छबिना पुन्हा मला लहान बनवतो. माझं लहानपण पुन्हा परतून येतं. संध्याकाळच्या हळदीच्या पिवळसर उन्हात पेठेत या छबिन्याची तयारी सुरु होते . व्यापारी मंडळी आणि पंढरपूरकर यांची पावले नव्या पेठेतील मारुती मंदिराकडे वळायला लागतात . समस्त पंढरपूरकर हि मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात . मावळतीची ऊनं संपूर्ण नव्या पेठेवर हळदी रंगाची उधळण करत असतात . वातावरणात भाविकांचा भक्ती भाव ओसंडून वहात असतो आणि अश्या भक्ती पूर्ण भारावलेल्या वातावरणात या छबिन्याची मार्गस्थ होण्याची तयारी सुरु असते . काही प्लस्टरच्या मूर्ती आणि सर्वात शेवटी रथात असणारी पंढरपूरच्या व्यापारी कमेटीच्या मारुतीची उत्सव मूर्ती असे या छबिन्याच्या मिरवणुकीचे स्वरूप असते . 
वर्षभर व्यापारी कमेटीच्या गोडाऊन मध्ये या प्ल्यस्टरच्या भव्य मूर्ती सुरक्षितपणे जपून ठेवलेल्या असतात . जवळपास सहा ते सात मूर्ती माझ्या लहानपणापासून या छाबिन्याच्या मिरवणुकीत असतात . 
सर्वात पुढे कंबरेवर हात ठेवून विजयी मुद्रेत उभा असलेला पैलवान, अंगात मलमलचा सदरा, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत सावरलेल्या , सदरा खराखुरा कापडाचा शिवून घातलेला असतो , कंबरेला लुंगी गुंडाळलेली , डोक्याला तुरेबाज फेटा आणि ओठांवर पाचुन्दाभर मिश्या, वर उचलेल्या हातात मानाचं कड , झेप घेण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे पायात अंतर अशी हि पैलवानाची मूर्ती छबिन्याच्या अग्रभागी असते जिला बघताच " वारे गब्रू " असा उद्गार तोंडातून निघायलाच हवा . भैरू पैलवान कि जय या यशवंत दत्तांच्या चित्रपटातील , “ पैलवान आला गं पैलवान आला हि लावणी आठवायलाचं हवी. पैलवानानंतर झूल पांघरलेला डौलदार हत्ती , पूर्वी हा हत्ती निळसर रंगाचा होता . मग एक मोठ्ठा मोर त्यानंतर घोड्यावर मांड ठोकून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यानंतर घोड्यावरच बसलेले दोन , तीन मावळे ( आम्ही लहानपणी यांना तानाजी , संताजी , धनाजी म्हणायचो ) असा हा छबिन्याचा फौज फाटा . भव्य दिव्य उंचीच्या या मूर्ती त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या कमी उंचीच्या बैल गाडीत चढवून पंढरपुरातील नव्या पेठेत आणून मारुती मंदिरासमोर उभ्या केल्या जायच्या . हा सगळा परिसर पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी आणि आमच्या सारख्या रसिकांनी भरून गेलेला असायचा . मारुतीची उत्सव मूर्ती रथात बसवली जायची मग हा छबिना मार्गस्थ व्हायचा . मारुती मूर्तीचा रथ अगदी झकास सजवलेला असायचा . चारी बाजूला कर्दळी , लाईटच्या ट्युबा , पूर्वी ग्यासबत्त्या होत्या . प्रत्येक मूर्ती समोर पंढरपुरातील घडशी समाजाच्या मंडळींचा स्वतंत्र ब्यांड असायचा . लेझीमही असायची मी लहानपणी हा छबिना बघायचो तेंव्हा प्रत्येक मूर्ती समोर ग्यास बत्त्या असायच्या . डोक्यावर ग्यास बत्त्या घेऊन काही पुरुष आणि स्त्रिया मिरवणुकीसोबत चालत असायचे. त्या उजेडात या मूर्ती जास्तच भव्य वाटायच्या . आता प्रखर झकपक लाईटचे दिवे संपूर्ण मिरवणुकीत असतात . फटाक्यांची आतषबाजी सुरु असायची . उत्साही नागरिक, व्यापारी नाचत असतात . पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गाने फिरत रात्री उशिरा या छबिन्याची सांगता होते . कित्येक पंढरपूरकर या छाबिन्या सोबत अगदी बरेच लांबवर चालत जातात . पेठेतली व्यापारी मंडळी तर नटून थटून छबीन्याच्या सोबत शेवट पर्यंत असतात . 
माझ्या पंढरपूरच्या आठवणीमधील ह्या छबिन्याची आठवण हा खूप आनंदाचा ठेवा आहे….. दर वर्षी मी या छाबिन्याच्या सोहळ्याला नव्या पेठेत हजर राहण्याचा प्रयत्न करतो आणि माझे लहानपणीचे ते सोन्याचे दिवस पुन्हा जागे करतो . 
व्यापारी कमेटीचा हा जवळपास १५० वर्ष जुना हनुमान जयंतीचा छबिना म्हणजे मर्मबंधातली ठेव बनला आहे शिवाय पंढरपूरचा एक आगळा वेगळा आनंददायी उपक्रम ...........श्याम सावजी.... पंढरपूर 

Sunday, April 14, 2019

गुरसाळयाच्या गढीचा खरा इतिहास .. भाग ३




|| श्री ||
गढीचा इतिहास जागा झाला !
काल मी पंढरपूर जवळ गुरसाळे गावी असलेल्या उध्वस्थ गढीची माहिती माझ्या वोल वर दिली होती . लोकांना ती चांगलीच आवडली . फेसबुक , व्हाट्स अप अश्या सगळीकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आल्या . काही फोन पण आले . यापैकी एक फोन जो माझे मित्र श्री यशपाल खेडकर सरांचा होता तो खूप महत्वाचा होता . श्री यशपाल खेडकर सर हे स्वेरी च्या कॉलेज ऑफ इंजीनिअरींग येथे प्राध्यापक आहेत त्यांनी गुरसाळ्याच्या या गढीचा इतिहास मला सांगितला . आणि त्या इतिहासाची त्यांच्या कडे असणाऱ्या " सोलापूर जिल्ह्याचा इतिहास " या पुस्तकातली माहितीही मला पाठवली . सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हे पुस्तक श्री गोपाळराव देशमुख यांनी लिहिले आहे . त्या पुस्तकातील माहिती पुढील प्रमाणे हैद्राबाद सरकारने मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातील निवडक कागद पत्राचे प्रकाशन तीन खंडात केले आहे . त्यातील भाग १ चे पृष्ठ २६८ वर आलेली माहिती गुरसाळे येथील कवड्यांचे वाड्या संबंधी आहे ती पुढील प्रमाणे ,
" पंढरपूरचे लढाईचे समयी मानाजीने आपली स्त्री गुरसाळे नजीक पंढरपूर येथे महिपतराव कवड्याचा लेक आवजी कवड्या याचे आश्रयाने छपावुन ठेवली . लढाईत मानाजीची शिकस्त होऊन फरारी होऊन गेल्यानंतर आवजी कवड्याने पंतप्रधानाचे ( सवाई माधवराव ) कारपरदारास ( नाना फडणीसास ) इतीला केली. ( माहिती दिली ) यांनी लिहून पाठविले कि तुमापासीच ठेवणे . मानाजी फाकड्या शरीक आहे . त्याची फहमायश करून आपले इजमामात ठेवावा व मानाजी महादजी शिंद्याचे बिरादरात येकसुइने राहिल्यास सरफरायी करावी हाही मनसुबा कारपरदासाचा आहे " १०४ लेखांक ८९ . १६ ऑगस्ट १७८१ 

पहा मंडळी म्हणजे या गढीचा संबंध थेट पेशवाई आणि तिच्या पराक्रमी सरदाऱांपर्यंत येउन पोहोचला. अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीला फाकड्या असे संबोधले जाई . आजही गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आपण " शाबास रे फाकड्या " असे म्हणतो . मानाजी फाकडे हा मराठेशाहीच्या तीन फाकड्यापैकी एक कर्तबगार , पराक्रमी , क्रूर असा सरदार राघोबा दादांच्या पक्षाचा होता . पानिपतच्या युद्धानंतर महादजी शिंद्यांना ग्वाल्हेर ची जहागीर मिळेपर्यंत सहा सात वर्षे मानाजी तेथील गढीचा मालक होता . महिपतराव कवडे , त्यांचा लेक आवजी कवडे हे राघोबा पक्षाचे होते .त्यामुळे संकट समयी मानाजीने आपली पत्नी कवडे यांच्या या गुरसाळयाच्या गढीत सुरक्षेच्या कारणास्तव ठेवली होती .
महिपतराव कवडे यांचा पुत्र आवजी कवडे यानेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाचे दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधलेले असल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे . 
पुस्तकात पुढे लेखक म्हणतात कि गुरसाळे येथील कवड्याचे वाड्याचे पश्चिम बाजूस बांधीव असलेली पाण्याची विहीर एक सुंदर बांधणीची असून अजूनही ती चांगल्या अवस्थेत आहे . ( हि विहीर मी आत उतरून बघितलेली आहे . आत काही भूयारांचे मार्ग पोहोचलेले आहेत ) कवडेंचा ऐतिहासिक वाडा जरी ढासळला असला तरी पाण्याची बारव मात्र एकवेळ आवर्जून पहावी अशी आहे . गुरसाळे प्रमाणे कवड्यांचे इनाम गाव अजनुज येथे उत्तम बांधणीचा तटबंधी वाडा विस्तीर्ण स्वरुपात आहे . तो अद्यापही बऱ्यापैकी अवस्थेत आहे .
पुण्यात कवड्यांचा वाडा होता . कुरकुंभच्या देवीची पुनर्बांधणी , गुरसाळे येथील वाडा आणि विहीर , अजनुज तालुका श्रीगोंदा येथील वाडा आणि विहीर हि ऐतिहासिक कामे आजही पाहण्यासाठी इतिहास अभ्यासकांनी जावे अशीच आहेत . ....... श्री गोपाळराव देशमुख ... ( सोलापूर जिल्ह्याचा इतिहास )
-------------------------------------------------------------------------------------------------------- 
पहा मंडळी केवढा इतिहास दडलेला आहे आपल्या आजूबाजूला . गुरसाळे हे गाव फक्त साखर कारखान्यामुळे आपल्याला परिचित होते मात्र या गावाचा संबंध पराक्रमी फाकडे सरदार आणि पेशवाइ शी संबंधित आहे हे पहिल्यांदाच समजलं . कवड्यांची विश्वास पात्रता सुद्धा यातून दिसून येते कि मानाजी फाकडे सारख्या सरदाराने कठीण काळात सुरक्षेसाठी आपली पत्नी कवडेंच्या या गढीत सुरक्षित ठेवली . धन्य आहे ....... 
--------------------------------------------------------------------------------------------------------
जाता जाता :---- मी या गढीत काल गेलो तेंव्हा माझ्या सोबत गढी दाखवण्यासाठी गुरासाळयाचे जे माझे मित्र आले होते त्यांचे नाव सचिन कवडे . काय योगायोग आहे कि या गढीचे मालक एक कवडेच होते आणि मला काल या गढीत फिरण्यासाठी वाट दाखवत ज्यांनी मदत केली ते सुद्धा कवडेच होते . त्या सरदार कवडेंचे हे कुणी वारसदार आहेत का हे मला माहित नाही. त्यांनाही या गढीचा इतिहास सांगता आला नाही . सगळ्या योगायोगाच्या गोष्टी .................. श्याम सावजी .... पंढरपूर


Saturday, April 13, 2019

भग्न गढी -भाग-2


|| श्री ||
भुयारातलं संकट ..
गढीतल्या भुयारात शिरण्याचा आमचा प्रयत्न पहिल्या वेळी वेळ कमी असल्याने आणि आम्ही सज्ज नसल्याने सोडून द्यावा लागला पण काही दिवसातच आम्ही गढीत परत जाण्याचे नियोजन केले . डिटेक्टिव्ह कथा वाचण्याचे ते दिवस असल्याने आणि फास्टर फेणे सारख्या कथा वाचून आमच्याही डोक्यात असले काही धाडस करण्याचा किडा वळवळत असल्याने आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केली . दोन तीन एव्हरेडीच्या ब्याटऱ्या , एक दोन चाकू ( अंगावर काही आलं तर सौरक्षण नको का ? ) , पायात त्यातल्या त्यात बरे बूट ( आत साप असले तर काय करायचं ? ) आणि हो एका मित्रानं सिगारेटचं आख्खं पाकीट आणलं होतं . ( सिगारेट ओढल्याने बुद्धी तल्लख होते असं कुणीतरी विद्वानांनी आम्हाला सांगितलं होतं आणि अश्या मोहिमेवर जाताना बुद्धी तल्लख असायलाच हवी नाही का ? ) काही जणांनी रिकाम्या पिशव्या घेतलेल्या होत्या . आत खजिना असला तर तो भरून घ्यायला पिशव्या हव्यातच ना ! असे सुसज्ज होऊन आम्ही गढी कडे निघालो . ( आज शाळेत दिवसभर जादा तास आहेत असं आम्ही घरी सांगितलेलं होतं )
सायकलीवर आम्ही गुरसाळे गाठलं आणि मग गढीत पोहोचलो . त्यातल्यात्यात आत शिरायला सोपं वाटणाऱ्या एका भुयाराच्या तोंडाशी आम्ही जमलो . तोडफार घाम प्रत्येकाच्या तोंडावर चमकताना दिसत होता . मनावर आलेला तणाव दूर व्हावा म्हणून प्रत्येकाने कमीत कमी एक सिगारेट संपवावी असा वैद्यकीय सल्ला कुणीतरी दिला मग बहुमताने हा सल्ला पास झाला . मग लगोलग ती सूचना अमलात आणण्यात आली . एका मित्राने मस्त लायटर आणलेला होता . त्याचं सर्वांनी विशेष कौतुक करत ओठातली सिगार पेटवली . मग सिगारेटचे झुरके मारत काही सूचना सल्ले एकमेकांना देण्यात आले . भूत या प्रकारावर त्या वयात जास्त विश्वास असल्याने सगळ्यांनी सोबत देवाचा लहानसा खिश्यात मावणारा फोटो वगैरे ठेवलेला होता . एका मित्रानं ओमचं लॉकेट खास स्टेशन रोड वरून दोन रुपयांना विकत आणून गळ्यात घातलेलं होतं . ( ओमचं लॉकेट गळ्यात असल्यावर भुते खेते जवळ येत नाहीत असं आम्ही एका चित्रपटात बघितलं होतं )
" हर हर महादेव " आमच्या भेदरलेल्या कंठातून कशीबशी गर्जना बाहेर पडली आणि आम्ही भुयाराच्या आत जाण्यास सज्ज झालो . आमच्यातले त्यातल्या त्यात धाडशी असणारे एक दोघे पुढे झाले . सर्वात मागे मीच होतो हे वेगळं सांगायला पाहिजे का मित्रांनो

एक पायरी , दुसरी पायरी , ..... सातवी पायरी ... एक एक पायरी मोजत आम्ही आत उतरू लागलो . हळू हळू बाहेरचा आत येणारा उजेड कमी झाला . ... " अरे बापरे समोर बरीच वळणं आहेत कि . " सर्वात पुढे असलेला मित्रं हातातल्या ब्याटरीचा उजेड समोत मारत म्हणाला . " जास्त आत गेलंच पाहिजे का ? " मी पाठीमागे वळून बघत म्हणालो . ( पुढे जाताना मागेही लक्ष असावं असं मी कुठेतरी वाचलेलं होतं. कारण अश्या मोहिमेत हल्ला नेहमी मागूनच होतो ) " छे छे आज या भुयाराचं रहस्य उलगडूनच जायचं " पुढे गेलेला एकजण म्हणाला . 
एक लांब बोळ ओलांडून आम्ही पुढे आलो एक महालासारखा छोटा भाग दिसला आणि कसला तरी बारीक गुई (((( गुई (((( आवाज कानावर यायला लागला . आम्ही आमच्या ब्याटऱ्या सगळीकडे फिरवल्या पण काही अंदाज येईना . पुढच्या मित्रांनी आणखी दोन पावले पुढे टाकली आणि एकदम गांधील माश्यांचा थवा आमच्या अंगावर झेपावला . काय होतंय ते कळायच्या आत त्या माश्यांनी आमच्या सर्वांगाचा ताबा घेतला . " बापरे पळा , गांधील माश्या आहेत आत " कुणीतरी ओरडलं . मी तर केंव्हा पासून आदेशाची वाट पाहत मागे पळायच्या तयारीत होतो . सगळ्यात पहिल्यांदा मी भुयाराच्या बाहेर पडलो . माझ्या पाठोपाठ एकेक सरदार भूयाराबाहेर आले . 
हाश्श ((( हुश्श करत सगळे तिथल्या दगडावर बसले . अचानक माझं लक्ष एका मित्राच्या पाठीकडे गेलं. त्याच्या शर्टवर पाठीकडून गांधील माश्यांचा थवा बसलेला होता . मी त्याला किंचाळत हि माहिती दिली . त्याने आपला शर्ट कसाबसा काढला . तो पर्यंत दुसर्याच्याही शर्ट वर माश्यांचा थवा दिसला . जवळ पास सगळ्यांच्याच पाठीवर गांधीला माश्यांचे थवे बसलेले होते . सगळ्यांनी किंकाळ्या फोडत आपल्या अंगातले शर्ट काढले . आणि शर्ट हवेत फिरवत त्या माश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र चिडलेल्या माश्यांनी जास्त त्वेषाने आमच्या वर हल्ला केला . आम्ही सगळे त्या माश्या शर्टच्या सहाय्याने हुसकावत गढीच्या त्या पडक्या वस्तुत पळायला लागलो . अचानक एका मित्राचं लक्ष गढीच्या उतरासामोरून वाहत जाणाऱ्या चंद्रभागेच्या पात्राकडे गेलं . " अरे चला नदीत बुड्या मारा , माश्या पाण्यात येत नाहीत " . सगळे गढीच्या उतारावरून पळत सुटलो . धबा धब आम्ही चंद्रभागेत बुड्या मारल्या . माश्यांचे थवे आमचा पाठलाग करत आलेच . आम्ही श्वास कोंडून पाण्यात बुड्या मारायचो आणि श्वास कोंडला कि परत वर यायचो . त्या गांधील माश्या काही वेळ पाण्यावर घोंघावत राहिल्या आणि मग निघून गेल्या . थोड्या वेळाने आम्ही पाण्याबाहेर आलो . अंगावरच कपडे वाळवले आणि सुजलेली तोंडे घेऊन घरी परतलो . 
जाता जाता :---- इतिहासातल्या अनेक मोहिमा शत्रू सैन्याच्या कुटील कारस्थानामुळे फसल्याचं तुम्ही वाचलं असेल पण गांधील माश्यांच्या कारस्थाना मुळे फसलेली हिच एक मोहीम असावी . 
......................................श्याम सावजी ( त्या असफल मोहिमेतला एक शिलेदार )..... पंढरपूर

Friday, April 12, 2019

गुरसाळयाची भग्न गढी .... भाग १




|| श्री ||
पंढरपूरच्या वायव्येला पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असणारे गुरसाळे हे गाव विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे . माझ्या लक्षात मात्र हे गाव राहिलं आहे ते तिथं असणाऱ्या एका जुन्या पुराण्या गढी मुळं. ( गढीचा अर्थ खाली दिला आहे .)
आम्ही दहावीत असताना आम्हाला शाळेच्या वतीने एक अभ्यास म्हणून हा कारखाना दाखवण्यासाठी नेण्यात आलं होतं . तेंव्हा हा कारखाना नुकताच सुरु झाला होता . ओसाड माळरानावर हा कारखाना उभा होता . फारशी बांधकामं आजूबाजूला न्हवती . हे गुरसाळे गावही तेंव्हा सध्या इतकं विकसित झालेलं नव्हतं . कारखाना बघून झाल्यावर तिथल्या पत्र शेडमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केलं , मग कुणी ताणून दिली तर काही जण गाण्याच्या भेंड्या खेळत बसले . आम्ही चार पाच जण बाहेर टेकड्यांवरून भटकत आलो . अचानक पश्चिमेकडे काही अंतरावर आमची नजर गेली आणि एका टेकडीवर उभी असणारी किल्ल्यासारखी हि वास्तू दिसली . आमच्या भागात अशी वास्तू कधी दिसलेली नसल्याने आणि किल्ला हा प्रकार फक्त इतिहासाच्या पुस्तकातच बघितला असल्याने कुतूहलाने आम्ही त्या गढीच्या दिशेने निघालो . थोडे अंतर काट्या कुट्यातून चालल्यावर आम्ही त्या टेकडीवर असणाऱ्या गढी जवळ येउन पोहोचलो . एक भव्य दरवाजा , त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज , थोडी अजून टिकून असलेली तटबंदी आमच्या नजरेला पडली . दरवाजातून आम्ही आत शिरलो . दोन्ही बाजूला उंच जोती होती . मग थोडे वळण आणि पुन्हा एक प्रवेश द्वार होते . त्यातून पुढे गेल्यावर आम्ही एका भग्न पठारावर येउन पोहोचलो . जागोजागी भुयारे दिसत होती . भूयारांचे बांधकाम आतून चांगले दगडी दिसत होते . आत उतरायला पायऱ्या होत्या . आमच्या पैकी काही धाडसी मित्रांनी त्या भुयारात उतरून डोकावून पाहिलं आणि आत लांबपर्यंत जाणारा मार्ग असल्याचं सांगीतलं . शिक्षकांच्या भीतीनं आणि वेळेत परत जायचं असल्यानं भुयारात जास्त लांब जाण्याचा आमचा विचार आम्ही टाळला आणि नंतर परत कधी या भुयारात जाण्याचं ठरवलं . उंच टेकडीवर ती गढी असल्याने तिथून चारी दिशांना लांबवरचं दृश्य दिसत होतं . अग्न्येये कडे असणारं पंढरपूर . काही अंतरावरून गढीला वळसा मारून वाहत पुढे गेलेली चंद्रभागा. दुरवर पसरलेली आसपासची शेतं .. त्या उध्वस्थ गढी मध्ये पाण्याच्या सोयीसाठी असणाऱ्या दोन मोठ्या चौकोनी विहिरी पण दिसल्या . गढीच्या त्या परिसरात काही वेळ फेरफटका मारून आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो . मात्र त्याचं वेळी आम्ही ठरवलं होतं कि पुढच्या वेळी खास ह्या गढी साठी एका रविवारी यायचं . 
काल काही कामानिमित्त कारखान्यावर आलो होतो तेंव्हा गढीच्या या आठवणी जाग्या झाल्या मग काम संपल्यावर गाडी गढीच्या दिशेने वळवली . योगायोगाने एक मित्र भेटले . त्यांनी गढी कडे नेलं. आता तिथे फक्त तो मुख्य दरवाजा उरला आहे . बुरुज , तट काही काही उरलेलं नाही . जमिनीवर असणारी भुयारं तशीच आहेत . त्या भुयारात काही अंतर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला . त्या भुयारात जाण्याचा प्रयत्न आम्ही शाळेच्या त्या दिवसातही परत एकदा केला होता मात्र त्या वेळी जो विचित्र अनुभव आम्हाला आला तो मी पुढच्या भागात सांगेन . 

Monday, April 8, 2019

पहिलीतल्या मैत्रिणीची रम्य भेट


|| श्री ||

मार्च महिना हा तसा अचानक कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा. हा अवकाळी पाउस अचानक कोसळतो आणि रम्य अनुभूती देऊन जातो. यंदा अजून पर्यंत तरी अवकाळी पाउस पंढरपुरात कोसळलेला नाही. पण माझ्या मनावर मात्र रम्य आठवणींचा पाऊस परवा कोसळून गेला. निमित्त झालं ते माझी इयत्ता पहिलीतली मैत्रीण मला भेटायला आल्याचं. या माझ्या शिशु विहार मधल्या मैत्रिणीची धाकटी बहिण माझ्या पत्नीच्या वर्गातली. ती माझ्या सौ.आणि आमच्या चिरंजीवांना बघायला घरी आली. तिच्याबरोबर तिची ही थोरली बहिण आमच्या घरी आली. घरी आल्या बरोब्बर तिनं माझ्या बायकोला सांगून टाकलं ,
मी तुला भेटायला आलेली नाही . श्याम सावजी तुझा नवरा आहे हे समजल्यावर त्याला भेटायला आलेय. मला हे अनपेक्षित होतं पण तिचा तो रोखठोक मोकळा स्वभाव बघून बरं वाटलं. मग आमच्या त्या इयत्ता पहिली दुसरीच्या दिवसातल्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेचे दिवस पुन्हा जागे झाले. मग मी माझ्या जवळ असणारा शाळेतला त्या दिवसांचा आमच्या वर्गाचा एकत्रित फोटो तिला दाखवला आणि तिलाच विचारलं ,
ओळख तू यात कुठं आहे ते ? ”
तिला सांगता येईना . माझ्या मात्र ती तेंव्हाची लक्षात होती. मी तिला ती फोटोत कुठं आहे ते दाखवलं.
अरेच्चा . ही मी का ? .अच्छा .. तू मला आठवतो आहेस तेंव्हाचा
ती कुतूहलानं स्वत:ला बघत बसली. ती अजूनही तशीच साधी , खेळकर वाटत होती. मी फक्त दोन वर्षे तिच्या वर्गात होतो. नंतर मी शाळा बदलली. त्या नंतर आम्ही कधीच एकमेकांसमोर आलो नाही. एकत्र एका वर्गात आलो नाही . पण या दोन वर्षात तिच्या वर्गात असणारा मी तिला आठवत होतो आणि अगदी मोकळेपणाने ४० पेक्षा जास्त वर्षांनी ती आमच्या घरी मला भेटायला आली ही माझ्यासाठी खूपच आनंददायक घटना होती. शाळेच्या दिवसातल्या आठवणींना उजाळा देऊन ती आमचा निरोप घेऊन निघून गेली. आमच्या अंगणातल्या चाफ्याची फुले अलगद उमलली आणि एक हलकी अवकाळीची सर त्या रात्री पंढरपुरात बरसून गेली.... .... श्याम सावजी.. पंढरपूर