Saturday, April 13, 2019

भग्न गढी -भाग-2


|| श्री ||
भुयारातलं संकट ..
गढीतल्या भुयारात शिरण्याचा आमचा प्रयत्न पहिल्या वेळी वेळ कमी असल्याने आणि आम्ही सज्ज नसल्याने सोडून द्यावा लागला पण काही दिवसातच आम्ही गढीत परत जाण्याचे नियोजन केले . डिटेक्टिव्ह कथा वाचण्याचे ते दिवस असल्याने आणि फास्टर फेणे सारख्या कथा वाचून आमच्याही डोक्यात असले काही धाडस करण्याचा किडा वळवळत असल्याने आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केली . दोन तीन एव्हरेडीच्या ब्याटऱ्या , एक दोन चाकू ( अंगावर काही आलं तर सौरक्षण नको का ? ) , पायात त्यातल्या त्यात बरे बूट ( आत साप असले तर काय करायचं ? ) आणि हो एका मित्रानं सिगारेटचं आख्खं पाकीट आणलं होतं . ( सिगारेट ओढल्याने बुद्धी तल्लख होते असं कुणीतरी विद्वानांनी आम्हाला सांगितलं होतं आणि अश्या मोहिमेवर जाताना बुद्धी तल्लख असायलाच हवी नाही का ? ) काही जणांनी रिकाम्या पिशव्या घेतलेल्या होत्या . आत खजिना असला तर तो भरून घ्यायला पिशव्या हव्यातच ना ! असे सुसज्ज होऊन आम्ही गढी कडे निघालो . ( आज शाळेत दिवसभर जादा तास आहेत असं आम्ही घरी सांगितलेलं होतं )
सायकलीवर आम्ही गुरसाळे गाठलं आणि मग गढीत पोहोचलो . त्यातल्यात्यात आत शिरायला सोपं वाटणाऱ्या एका भुयाराच्या तोंडाशी आम्ही जमलो . तोडफार घाम प्रत्येकाच्या तोंडावर चमकताना दिसत होता . मनावर आलेला तणाव दूर व्हावा म्हणून प्रत्येकाने कमीत कमी एक सिगारेट संपवावी असा वैद्यकीय सल्ला कुणीतरी दिला मग बहुमताने हा सल्ला पास झाला . मग लगोलग ती सूचना अमलात आणण्यात आली . एका मित्राने मस्त लायटर आणलेला होता . त्याचं सर्वांनी विशेष कौतुक करत ओठातली सिगार पेटवली . मग सिगारेटचे झुरके मारत काही सूचना सल्ले एकमेकांना देण्यात आले . भूत या प्रकारावर त्या वयात जास्त विश्वास असल्याने सगळ्यांनी सोबत देवाचा लहानसा खिश्यात मावणारा फोटो वगैरे ठेवलेला होता . एका मित्रानं ओमचं लॉकेट खास स्टेशन रोड वरून दोन रुपयांना विकत आणून गळ्यात घातलेलं होतं . ( ओमचं लॉकेट गळ्यात असल्यावर भुते खेते जवळ येत नाहीत असं आम्ही एका चित्रपटात बघितलं होतं )
" हर हर महादेव " आमच्या भेदरलेल्या कंठातून कशीबशी गर्जना बाहेर पडली आणि आम्ही भुयाराच्या आत जाण्यास सज्ज झालो . आमच्यातले त्यातल्या त्यात धाडशी असणारे एक दोघे पुढे झाले . सर्वात मागे मीच होतो हे वेगळं सांगायला पाहिजे का मित्रांनो

एक पायरी , दुसरी पायरी , ..... सातवी पायरी ... एक एक पायरी मोजत आम्ही आत उतरू लागलो . हळू हळू बाहेरचा आत येणारा उजेड कमी झाला . ... " अरे बापरे समोर बरीच वळणं आहेत कि . " सर्वात पुढे असलेला मित्रं हातातल्या ब्याटरीचा उजेड समोत मारत म्हणाला . " जास्त आत गेलंच पाहिजे का ? " मी पाठीमागे वळून बघत म्हणालो . ( पुढे जाताना मागेही लक्ष असावं असं मी कुठेतरी वाचलेलं होतं. कारण अश्या मोहिमेत हल्ला नेहमी मागूनच होतो ) " छे छे आज या भुयाराचं रहस्य उलगडूनच जायचं " पुढे गेलेला एकजण म्हणाला . 
एक लांब बोळ ओलांडून आम्ही पुढे आलो एक महालासारखा छोटा भाग दिसला आणि कसला तरी बारीक गुई (((( गुई (((( आवाज कानावर यायला लागला . आम्ही आमच्या ब्याटऱ्या सगळीकडे फिरवल्या पण काही अंदाज येईना . पुढच्या मित्रांनी आणखी दोन पावले पुढे टाकली आणि एकदम गांधील माश्यांचा थवा आमच्या अंगावर झेपावला . काय होतंय ते कळायच्या आत त्या माश्यांनी आमच्या सर्वांगाचा ताबा घेतला . " बापरे पळा , गांधील माश्या आहेत आत " कुणीतरी ओरडलं . मी तर केंव्हा पासून आदेशाची वाट पाहत मागे पळायच्या तयारीत होतो . सगळ्यात पहिल्यांदा मी भुयाराच्या बाहेर पडलो . माझ्या पाठोपाठ एकेक सरदार भूयाराबाहेर आले . 
हाश्श ((( हुश्श करत सगळे तिथल्या दगडावर बसले . अचानक माझं लक्ष एका मित्राच्या पाठीकडे गेलं. त्याच्या शर्टवर पाठीकडून गांधील माश्यांचा थवा बसलेला होता . मी त्याला किंचाळत हि माहिती दिली . त्याने आपला शर्ट कसाबसा काढला . तो पर्यंत दुसर्याच्याही शर्ट वर माश्यांचा थवा दिसला . जवळ पास सगळ्यांच्याच पाठीवर गांधीला माश्यांचे थवे बसलेले होते . सगळ्यांनी किंकाळ्या फोडत आपल्या अंगातले शर्ट काढले . आणि शर्ट हवेत फिरवत त्या माश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र चिडलेल्या माश्यांनी जास्त त्वेषाने आमच्या वर हल्ला केला . आम्ही सगळे त्या माश्या शर्टच्या सहाय्याने हुसकावत गढीच्या त्या पडक्या वस्तुत पळायला लागलो . अचानक एका मित्राचं लक्ष गढीच्या उतरासामोरून वाहत जाणाऱ्या चंद्रभागेच्या पात्राकडे गेलं . " अरे चला नदीत बुड्या मारा , माश्या पाण्यात येत नाहीत " . सगळे गढीच्या उतारावरून पळत सुटलो . धबा धब आम्ही चंद्रभागेत बुड्या मारल्या . माश्यांचे थवे आमचा पाठलाग करत आलेच . आम्ही श्वास कोंडून पाण्यात बुड्या मारायचो आणि श्वास कोंडला कि परत वर यायचो . त्या गांधील माश्या काही वेळ पाण्यावर घोंघावत राहिल्या आणि मग निघून गेल्या . थोड्या वेळाने आम्ही पाण्याबाहेर आलो . अंगावरच कपडे वाळवले आणि सुजलेली तोंडे घेऊन घरी परतलो . 
जाता जाता :---- इतिहासातल्या अनेक मोहिमा शत्रू सैन्याच्या कुटील कारस्थानामुळे फसल्याचं तुम्ही वाचलं असेल पण गांधील माश्यांच्या कारस्थाना मुळे फसलेली हिच एक मोहीम असावी . 
......................................श्याम सावजी ( त्या असफल मोहिमेतला एक शिलेदार )..... पंढरपूर

No comments:

Post a Comment