Friday, April 19, 2019

आनंदाची ठेव


|| श्री ||
 व्यापारी कामेटीचा छबिना...
अगदी कळत्या वयापासून हा हनुमान जयंती निमित्त पंढरपुरातून निघणारा व्यापारी कमेटीचा छबिना मी बघत आलो आहे . अगदी लहानपणी आज्जीचं बोट धरून मी हा छबिना बघायला जायचो. आजही मी हा छबिना बघायला आवर्जून जातो . नाही गेलो किंवा काही कारणानं जायला जमलं नाही तर अगदी मोठा गुन्हा केल्यासारखं वाटतं. हा छबिना पुन्हा मला लहान बनवतो. माझं लहानपण पुन्हा परतून येतं. संध्याकाळच्या हळदीच्या पिवळसर उन्हात पेठेत या छबिन्याची तयारी सुरु होते . व्यापारी मंडळी आणि पंढरपूरकर यांची पावले नव्या पेठेतील मारुती मंदिराकडे वळायला लागतात . समस्त पंढरपूरकर हि मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात . मावळतीची ऊनं संपूर्ण नव्या पेठेवर हळदी रंगाची उधळण करत असतात . वातावरणात भाविकांचा भक्ती भाव ओसंडून वहात असतो आणि अश्या भक्ती पूर्ण भारावलेल्या वातावरणात या छबिन्याची मार्गस्थ होण्याची तयारी सुरु असते . काही प्लस्टरच्या मूर्ती आणि सर्वात शेवटी रथात असणारी पंढरपूरच्या व्यापारी कमेटीच्या मारुतीची उत्सव मूर्ती असे या छबिन्याच्या मिरवणुकीचे स्वरूप असते . 
वर्षभर व्यापारी कमेटीच्या गोडाऊन मध्ये या प्ल्यस्टरच्या भव्य मूर्ती सुरक्षितपणे जपून ठेवलेल्या असतात . जवळपास सहा ते सात मूर्ती माझ्या लहानपणापासून या छाबिन्याच्या मिरवणुकीत असतात . 
सर्वात पुढे कंबरेवर हात ठेवून विजयी मुद्रेत उभा असलेला पैलवान, अंगात मलमलचा सदरा, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत सावरलेल्या , सदरा खराखुरा कापडाचा शिवून घातलेला असतो , कंबरेला लुंगी गुंडाळलेली , डोक्याला तुरेबाज फेटा आणि ओठांवर पाचुन्दाभर मिश्या, वर उचलेल्या हातात मानाचं कड , झेप घेण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे पायात अंतर अशी हि पैलवानाची मूर्ती छबिन्याच्या अग्रभागी असते जिला बघताच " वारे गब्रू " असा उद्गार तोंडातून निघायलाच हवा . भैरू पैलवान कि जय या यशवंत दत्तांच्या चित्रपटातील , “ पैलवान आला गं पैलवान आला हि लावणी आठवायलाचं हवी. पैलवानानंतर झूल पांघरलेला डौलदार हत्ती , पूर्वी हा हत्ती निळसर रंगाचा होता . मग एक मोठ्ठा मोर त्यानंतर घोड्यावर मांड ठोकून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यानंतर घोड्यावरच बसलेले दोन , तीन मावळे ( आम्ही लहानपणी यांना तानाजी , संताजी , धनाजी म्हणायचो ) असा हा छबिन्याचा फौज फाटा . भव्य दिव्य उंचीच्या या मूर्ती त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या कमी उंचीच्या बैल गाडीत चढवून पंढरपुरातील नव्या पेठेत आणून मारुती मंदिरासमोर उभ्या केल्या जायच्या . हा सगळा परिसर पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी आणि आमच्या सारख्या रसिकांनी भरून गेलेला असायचा . मारुतीची उत्सव मूर्ती रथात बसवली जायची मग हा छबिना मार्गस्थ व्हायचा . मारुती मूर्तीचा रथ अगदी झकास सजवलेला असायचा . चारी बाजूला कर्दळी , लाईटच्या ट्युबा , पूर्वी ग्यासबत्त्या होत्या . प्रत्येक मूर्ती समोर पंढरपुरातील घडशी समाजाच्या मंडळींचा स्वतंत्र ब्यांड असायचा . लेझीमही असायची मी लहानपणी हा छबिना बघायचो तेंव्हा प्रत्येक मूर्ती समोर ग्यास बत्त्या असायच्या . डोक्यावर ग्यास बत्त्या घेऊन काही पुरुष आणि स्त्रिया मिरवणुकीसोबत चालत असायचे. त्या उजेडात या मूर्ती जास्तच भव्य वाटायच्या . आता प्रखर झकपक लाईटचे दिवे संपूर्ण मिरवणुकीत असतात . फटाक्यांची आतषबाजी सुरु असायची . उत्साही नागरिक, व्यापारी नाचत असतात . पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गाने फिरत रात्री उशिरा या छबिन्याची सांगता होते . कित्येक पंढरपूरकर या छाबिन्या सोबत अगदी बरेच लांबवर चालत जातात . पेठेतली व्यापारी मंडळी तर नटून थटून छबीन्याच्या सोबत शेवट पर्यंत असतात . 
माझ्या पंढरपूरच्या आठवणीमधील ह्या छबिन्याची आठवण हा खूप आनंदाचा ठेवा आहे….. दर वर्षी मी या छाबिन्याच्या सोहळ्याला नव्या पेठेत हजर राहण्याचा प्रयत्न करतो आणि माझे लहानपणीचे ते सोन्याचे दिवस पुन्हा जागे करतो . 
व्यापारी कमेटीचा हा जवळपास १५० वर्ष जुना हनुमान जयंतीचा छबिना म्हणजे मर्मबंधातली ठेव बनला आहे शिवाय पंढरपूरचा एक आगळा वेगळा आनंददायी उपक्रम ...........श्याम सावजी.... पंढरपूर 

No comments:

Post a Comment