Saturday, October 5, 2019

पंढरपुरातील देवी दर्शन - २

|| श्री ||
मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवी
पंढरपूरच्या अग्नेय दिशेला चंद्रभागेच्या काठावर हे मंदिर आहे यमाई तुकाई सोडली तर पंढरपुरच्या इतर चारही मुख्य देवी आग्नेय ,नैरुत्य ,वायव्य आणि ईशान्य या दिशांना आहेत . ( या पंढरपूरच्या सीमा रक्षक या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असाव्यात का ?) मंगळवेढ्याला जाणाऱ्या रोडवर एक लहानशी किल्ल्या सारखी किंवा गढी सारखी पडकी वास्तू आहे त्यात हे देवीचे मंदिर आहे . घाडगे नावाच्या सरदाराची हि गढी असल्याचं मी लहानपणी ऐकलं होतं . त्यामुळे आम्ही या देवीला घाडग्यांची देवी असं म्हणायचो . मला लहानपणी किल्ल्यात आल्याचं समाधान इथं आल्यावर व्हायचं .आत भरमसाठ वाढलेली झाडी आजही आहे . या देवीच्या मंदिराकडे तसं दुर्लक्षच झालं होतं तेंव्हा . पूर्वी एका लहानश्या पत्र्याच्या खोलीत देवीची मूर्ती होती. आता मोठं बांधकाम सुरु आहे . या नवरात्रात हे बांधकाम जवळ जवळ पूर्णत्वास आलेलं दिसलं .
अंबाबाई पटांगणातील देवीच्या माझ्या तितक्याश्या आठवणी नाहीत कारण तेंव्हा मी पाळण्यात होतो मात्र या देवीच्या बाबतीत माझ्या आठवणी ताज्या आहेत .
देवीच्या खोली बाहेर मोठ्ठा ओटा होता त्यावर मंदिराच्या पुजारीणबाई त्यांना आक्का बाई म्हणायचे त्या बसलेल्या असायच्या. वयस्कर होत्या आणि एकदम कडक . मंदिरातली शिस्त कोणी मोडली कि त्या रागवायच्या . याचा फटका मला पण बसला होता . त्यामुळे त्यांना मी खूप घाबरायचो . त्यांच्या कडेने आराधी , गोंधळी आणि भक्त महिलांचा गराडा असायचा . टांग्यातून पूजेचे साहित्य घेऊन आम्ही मंदिरात जायचो . माझ्या घरचे आक्का बाईशी गप्पा मारण्यात किंवा पूजेत गर्क झाल्यावर मी समोरच्या मैदानात खेळायला पळायचो . देवीच्या मूर्तीच्या समोर काही लहान लहान मंदिरे म्हणजे देवळ्या आहेत त्यात मरिआइ वगैरेंचे तांदळे आहेत . एक माकडाची मूर्ती आहे . या मूर्तीची कथा मी नंतर सांगेन . एक विटा आणि चुन्याची बनवलेली फारशी उंच नसलेली दीपमाळ आहे . ही दीपमाळ आणि ती छोटी छोटी मंदिरे एका रेषेत असल्याने मला ते सगळे रेल्वे गाडी प्रमाणे वाटायचे . ती दीपमाळ म्हणजे रेल्वेचे धुरांडे आणि मागची ओळीत असणारी देवळे म्हणजे तिचे डबे . दीपमाळ आणि इतर देवळे यांच्या मध्ये मोकळी जागा होती त्यात बसून मी ती र्रेल्वे चालवल्याचा अभिनय करायचो . हा... हा... हा... जणू काही ते देवीचे मंदिरच मी ओढून नेत होतो . या दीपमाळे जवळ एक छोटंसं चाफ्याचं झाड होतं . अगदी लहान उंचीचे पण बळकट . त्याच्यावर चढून त्याच्या फांद्या वरून उड्या मारायचाही उद्योग मी येथे आल्यावर करायचो ... लहानपणी या देवी बद्दल ब-याचश्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या . त्यातील एका आख्यायिकेनुसार या गढी जवळच्या शेतात नांगरट करताना हि देवीची मूर्ती सापडली . दुसऱ्या आख्यायिकेनुसार घाडगे सरदारांना तुळजापूरला जायला वयोमानाने जमेना याची त्यांना खंत वाटू लागली . तेंव्हा एकदा स्वप्नात येउन देवीने आपण त्यांच्या गढीतील विहिरीत असल्याचे सांगितले . सकाळी सरदार घाडगे यांनी शोध घेतला असता विहिरीच्या एका कोनाड्यात त्यांना हि मूर्ती सापडली .. तीच हि आजची देवीची मुर्ती . सरदारांनी गढीतच तिचं छोटसं मंदिर बांधलं आणि तिथेच ते देवीची पूजा ,अर्चा ,सेवा करू लागले .आजही ती विहीर आणि त्या विहिरीतली मूर्ती सापडलेली देवळी तशीच आहे .
लहानपणी विहिरींची भीती वाटत असल्याने मी मंदिरा मागे असणाऱ्या या विहिरीकडे जात नसे . गढीचे भग्न अवशेष घाडगे सरदारांच्या वैभवाची साक्ष आजही देतात . गढीचे काही बुरुज आणि तट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत . मुख्य दरवाजा भव्य आणि देखणा आहे . त्या जुन्या काळाची आठवण करून देत दिमाखाने उभा आहे . गढीच्या परिसरात भूतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . त्याच्या समोर राम मंदिर आहे . ही गढी आणि गढीचा परिसर हा माझ्या साठी आनंदाचे ठिकाण आहे . या मंदिराच्या परिसरात बसून मावळतीला जाणारा सुर्य बघणे हा माझा आवडता छंद .. जगदंब ! ...............................श्याम सावजी ..पंढरपूर

Friday, October 4, 2019

पंढरपूरातील देवी दर्शन. . 1

|| श्री ||
पंढरपूरातील देवी दर्शन. . 1
अंबाबाई पटांगणातली देवी
पंढरपूरच्या ईशान्येला चंद्रभागेच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. मोठ्या विस्तीर्ण वृक्षांनी हे मंदिर वेढलेले आहे. मंदिरासमोरच्या एका वृक्षाच्या ढोलीत एक माणूस सहज बसू शकेल इतकी मोठी ढोली या वृक्षाला आहे या वरून या वृक्षाची जाडी आणि जुनेपण लक्षात यावे. मंदिर साधे सुबक आहे. मंदिरात देवीची सुबक मूर्ती आहे . तुळजापुरच्या देवीचीच हि प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते . निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात पंढरपूरकर मोठ्या प्रमाणावर मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी करतात . नवरात्रीत तर या मंदिराबाहेरील रांग संपता संपत नाही .पंढरपुरातील हे मुख्य देवी मंदिर आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . पूर्वी या मंदिराच्या कडेने असणाऱ्या मैदानाला आंबाबाईचे पटांगण म्हटले जायचे . या मैदानात क्रिकेटचे सामने नेहमीच भरायचे .
...आम्ही जुन्या पेठेत राहायला आल्यावर त्यावेळी आमची परिस्थिती तशी वाईट होती . माझ्या घरच्यांनी या देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली . योगायोगाने आमची परिस्थिती सुधारली . चांगले दिवस आले . समृद्धी आली . स्वतःचे घर खरेदी केले . या देवीवरची आमच्या घरच्यांची श्रद्धा वाढली .आणि मग हे देवीचे देऊळ नवरात्रीत रंगवण्याचा खर्च आमच्या घरच्यांनी देण्यास सुरुवात केली . देवळाच्या भिंतींवर पौराणिक प्रसंग वनारे पेंटर खूपच सुंदर पद्धतीने काढायचे . काही वर्षे ह्या उपक्रमात सातत्य राहिले मात्र काही कारणा वरून मंदिराच्या पुजाऱ्याशी तात्विक मतभेद झाल्याने आमच्या घरच्यांनी हा उपक्रम बंद केला आणि मग मंगळवेढा रोडला असणाऱ्या घाडग्यांच्या देवीला जायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली .. या घाडग्यांच्या देवी बद्दल मी सांगणार आहेच पण तो पर्यंत जगदंब .
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ! .... श्याम सावजी ..पंढरपूर

Monday, August 12, 2019

पुराच्या वेढ्यातले २ दिवस २ रात्री


|| श्री ||
पुराच्या वेढ्यातले २ दिवस २ रात्री
चंद्रभागेचा पूर आता बराच ओसरला आहे. घाट जवळपास रिकामे झाले आहेत. गेला आठवडाभर सुरु असलेला पुराचा थरार आता संपत आला आहे किंवा संपल्यात जमा आहे. पण २ दिवस त्या पूरस्थितीने आमची केलेली अवस्था काहीशी अडचणीची झाली.
 ५ तारखेपासून पाण्याने घाटांच्या पायऱ्यांशी स्पर्धा सुरु केली आणि ७ तारखेला पाणी घाट ओलांडून गावात शिरले. तसे गटारी, धबधबे यांच्या माध्यमातून आधीच गावात आले होते. चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱ्या शेगाव दुमाला गावात स्पीकरवरून दवंडी दिली जात होती. सावधगिरी बाळगा पाणी वाढत आहे असे ते सांगत होते.
 ७ तारखेला बुधवारी आमच्या कासार घाटाच्या सर्व पायऱ्या पाण्यात बुडाल्या आणि आमच्या वाड्याच्या उत्त्तर दारातून पाणी वाड्यात शिरले. सकाळी ८ वाजता विद्युत पुरवठा बंद झाला आणि आमची परीक्षा सुरु झाली. इतक्यात लाईट जाईल याचा अंदाज नसल्याने मोबाईल वगैरे चार्ज करण्यात आमची हयगय झाली आणि तासाभरात मोबाइलं कोमात गेला. TV बंद झालेला होताच. सतत करमणुकीला चटावलेला मी काहीसा कावराबावरा झालो. पॉवर सेव्हरही साथ देत नव्हता.
आमच्या सज्जातून चंद्रभागेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार मंडळी यायला लागली. त्यांच्याशी गप्पा टप्प्पात काही वेळ मजेत गेला. ओळखीचे काही नागरिकही पाणी बघण्यासाठी आणि त्या पाण्यासोबत छायाचित्र काढून घेण्यासाठी घरी गर्दी करायला लागले. या सगळ्यात वेळ छान गेला पण रात्री काय होणार याची चिंता होतीच. तोही प्रश्न सुटला. पाणी बघण्यासाठी आलेल्या कल्पक कोठाडिया या आमच्या मित्राला आमच्या परिस्थितीची जाणीव झाली आणि त्याने त्याच्या दुकानातली ग्यासबत्ती फुल्ल करून पाठवून दिली. त्यानंतर दुपारी आणखी काही मित्र आले ज्यांनी मेणबत्त्या, काडे पेट्या, चार दिवस पुरतील असे टिकाऊ खाद्यपदार्थ आणले. ते मित्र म्हणजे डॉं. प्राजक्ता बेणारे, मुन्ना शेख , मनोज दाते, पार्थ बेणारे, निमा भिंगे इत्यादी.  मनोज दातेने त्याच्याकडचा पॉवर सेव्हर आणून दिला पण माझा मोबाईल त्याला कनेक्ट होईना. गल्लीतल्या कोकाटेंनी त्यांचा सौर उर्जेवर चालणारा चार्जर दिला त्यावर कसे बसे ३० % चार्गिंग झाले. डॉं. सुळे यांनी काही अत्यावश्यक औषधांचा साठा करून दिला. एकंदर मित्रांच्या मदतीने आम्ही पूर परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झालो.
वाडा सोडायचा नाही हे आमचे पक्के ठरले होते. यापूर्वीचे बरेच पूर माझ्या सासरच्या मंडळींनी या वाड्यातच राहून संपवले आहेत . वाड्यात कंबरे एवढे पाणी असताना त्यांनी पुरात १० दिवस काढले आहेत. त्यामुळे त्यांना फारशी चिंता वाटतं नव्हती पण माझा मात्र पुरात या वाड्यात राहण्याचा पहिलाच अनुभव. त्यात राजस , रथिन यंदा सोबत. पूर्वेकडच्या ग्यालरीचा भाग बराच दुबळा झालेला.
तर एकदाची संध्याकाळ झाली आणि आम्ही ग्यासबत्ती पेटवली. एक गूढ वातावरण वाड्यात तयार झाले. वाड्यातल्या ४ कुटुंबियांपैकी एक कुटुंब पाण्याच्या आणि पाण्याबरोबर येणाऱ्या साप -आणि इतर किटकांच्या धास्तीने वाडा सोडून गेले होते. इतर २ कुटुंबांनी त्यांचे महत्वाचे सामान वरच्या मजल्यावर आणून टाकले होते. आमचा तर मुक्कामच वरच्या मजल्यावर.  पाठीमागे पाणी पातळी वाढत होतीच. वाळवंटातले लाईट बंद झाल्याने फक्त पाण्याचा आवाज ऐकू येत होता. नदी पात्रापलीकडेच्या शेगाव दुमाला गावातील सार्वजनिक दिवे , म्हसोबा देवस्थान, हरेकृष्ण घाट, प्रभुजी बैठक या ठिकाणी असणाऱ्या दिव्यांचा अंधुक उजेड फक्त वाळवंटात पाण्यावर दिसत होता. कोळी लोकांच्या नावा कासार घाटाच्या अगदी वरच्या पायरीला थडकत होत्या. बघ्यांची गर्दी घाटावर वाढत होती.
रात्री ८ वाजता गल्लीतल्या काहीजणांनी जेवणाचे डबे आणले आणि आम्ही एकत्र जेवण केले. मग गप्पा रंगल्या. या पूर्वीच्या पुरांच्या आठवणी रंगत गेल्या.  डासांचा त्रास चांगलाच वाढला होता. मग त्यांची सोय म्हणून कासव छाप, ओडोमास वगैरे साहित्य आणावे लागले. या सगळ्यात राजस , रथीनची साथ महत्वाची होती. आहे या परिस्थितीत पोरं खेळून झोपी गेली. आम्हीपण शेवटी ११ वाजता झोपेच्या स्वाधीन देह केला. अर्थात रात्रभर अधून मधून उठून पाण्याचा , पूर स्थितीचा अंदाज घेणे सुरूच होते. कोळी बांधवांच्या नावा आमच्या वाड्याच्या भिंतीला टेकल्या होत्या. त्यातील नावाडयांच्या गप्पा सोबत बरेचजण असल्याची जाणीव करून देत होत्या. त्यांच्या मोबाईल वरील गाणी वातावरणातला तणाव कमी करत होती.
दुसरा दिवस म्हणजे गुरुवार ८ ऑगस्ट आधल्या दिवसाप्रमाणेच गेला. चंद्रभागा आता गल्लीत शिरली होती. कासार घाटावरून वर आलेले पाणी आणि चंद्रभागा घाटावरून आलेले पाणी यांचा मिलाप आमच्या गल्लीत खरे वाड्यासमोर झाला आणि खऱ्या अर्थाने आमची गल्लीतील पूर्व दिशेकडील आमचे कपोल निवास, बबन जोशीचे घर, रामदास मठ, साखरे महाराज मठ, खरे वाडा, रुमालावाला धर्मशाळा या वास्तू चारीबाजुनी पाण्याने वेढलेले बेट बनल्या. माझी मोटारसायकल मी कशीबशी वाडयात घेतली. आजचाही दिवस पाणी बघायला येणार्या मंडळीच्या वर्दळीत आणि त्यांच्याशी गप्पा टप्पा यात गेला. आज वर्तमानपत्रही आले नाही त्यामुळे बाह्य जगाशी संपर्क तुटल्यासारखा झाला. वाड्यातल्या मोहोळकरांचा ट्राझिस्टर रेडीओ हा बातम्या वगैरे ऐकण्यासाठी आधार होता. कालच्या प्रमाणेच आजचीही रात्र मेणबत्त्या आणि ग्यास बत्तीच्या उजेडात सरली.
शुक्रवारी ९ तारखेला सकाळी चंद्रभागा कासार घाटाच्या निम्य्यावर गेल्याचे समजले आणि हायसे वाटले. १२ वाजेपर्यंत पूर बराच ओसरला. काही वेळाने लाईटही आले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
...........................श्याम सावजी.. पंढरपूर  


Sunday, August 4, 2019

आठवणीतले भन्नाट कॅप्टन बाजीराव रणगाडे




|| श्री || 
आठवणीतले भन्नाट कॅप्टन बाजीराव रणगाडे 
' माझा पती करोडपती ' हा सचिन यांचा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक . हलकी फुलकी विनोदी कथा , सुप्रियाचा बेरकी अभिनय , निळू फुले यांची वेगळी भूमिका आणि सर्वात भन्नाट म्हणजे अशोक मामा सराफ यांनी साकारलेली कॅप्टन बाजीराव रणगाडे ही अफलातून व्यक्तिरेखा . ही व्यक्तिरेखा मला इतकी आवडली होती की मी चक्क माझ्या एक नाटकात या भूमिकेची नक्कल केली . तो किस्सा , ते रहस्य आज तुमच्या समोर जवळपास 28 वर्षानंतर उलगडतोय.
' माझा पती करोडपती ' हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित झाला . तेंव्हा मी वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाला होतो . 1986 ला महेश कोठारे यांच्या ' धूम धडाका ' या सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं आणि असे हलके फुलके , विनोदी चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , सचिन , महेश कोठारे यानं घेऊन बनवण्याची एक लाट आली . यातले काही चित्रपट खरोखरच चांगले होते तर काही अगदी टुकार . ' गमंत जम्मत ', ' दे दणादण ', ' थरथराट ' ' आम्ही दोघं राजा राणी ', ' अशी ही बनवा बनवी ' असे काही चांगले चित्रपट या लाटेत बघायला मिळाले . नंतर अती झालं आणि उतू गेलं या उक्ती प्रमाणे लोक सवंग विनोदपटांना कंटाळले . मराठी रसिकांनी अश्या अनेक लाटा अनुभवल्या आहेत ' माहेरची साडी ' नंतर कुबल यांना घेऊन अनेक रडूपट आले . धुमधडाका नंतर हास्यपट आले आता पाळण्यातल्या पोरा पोरींच्या प्रेमपटांची लाट आली आहे . असो कालाय तस्मै नमः !
तर आपण ' माझा पती करोडपती ' बद्धल बोलत होतो .
1988 साली ग्यादरिंग साठी आम्ही ' दिनूच्या राधाबाई ' हे धमाल विनोदी नाटक बसवत होतो . त्यातली ' डॉ . नाय ' ही धमाल व्यक्तिरेखा मी साकार करत होतो . ही भूमिका साकार करत असताना माझ्या डोळ्यासमोर लकब म्हणून चार्ली चॅप्लिन होते . त्यांची ती बदकी चाल आणि ओठ घट्ट मिटून घेण्याची लकब उचलायचं मी ठरवलं होता . दुसऱ्या दिवशी नाटकाचा स्नेहसंम्मेलनातला मुख्य प्रयोग होता . सकाळी शेवटची रंगीत तालीम होती . ती आटोपून दुपारच्या वेळी मी घरी परतलो . आमच्या शेजारी राहणाऱ्या काही आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीवर व्ही सी आर आणला होता . तेंव्हा व्ही सी आर भाड्याने मिळायचे . मोठ्या चौकोनी कॅसेट काही जणांना आठवत असतील . तर त्यांनी काही विनोदी चित्रपट आणले होते . मला त्यांनी चित्रपट बघायला बोलावलं आणि चित्रपट लावला तो ' माझा पती करोडपती '
सुरुवातीला चित्रपटाने फारशी पकड घेतली नाही पण अशोक सराफ यांचा कॅप्टन बाजीराव रणगाडे पडद्यावर अवतरला आणि थक्क झालो . अशोक मामांनी ज्या अफलातून पद्धतीने हा कॅप्टन बाजीराव रणगाडे साकारला आहे तो केवळ लाजवाब . त्या दिवशी दोन वेळा आम्ही हा ;' माझा पती करोडपती ' बघितला . कॅप्टन बाजीराव रणगाडे या व्यक्तिरेखेने माझ्या वर गारुड केलं. माझ्या डोक्यातला चार्ली चॅप्लिन पार पळून गेलं आणि अस्सल मराठमोळा बाजीराव रणगाडे पक्का बसला . कॅप्टन रनगाडेचा ह्यान्गओव्हर माझ्यावर चढला . इतका की दुसऱ्या दिवशी मी माझी ' डॉ नाय ' ही व्यक्तिरेखा कॅप्टन बाजीराव रणगाडे या व्यक्तिरेखेच्या प्रभावाखाली सादर केली आणि अभिनयाचा पुरस्कारही मिळवला . अर्थात ह्याचा श्रेय जात ते अशोक सराफ यांनी साकारलेल्या कॅप्टन बाजीराव रनगाडेला .त्यांच्या रणगाडे मुळे मला एक उत्तम रोल मॉडेल मिळालं. 
जाता जाता :- परवा ' दिनूच्या सासूबाई ' नाटकाचे फोटो बघताना ह्या आठवणी ताज्या झाल्या आणि आज त्या तुमच्या समोर मांडतोय . ३० वर्षानंतर एक कबुली जबाब देतोय . होय मी चक्क नक्कल केली . पण मला एक दर्जेदार मराठी कलाकाराची नक्कल केल्याचा आनंदही होतोय . 
श्याम सावजी ..... पंढरपूर

Saturday, July 20, 2019

ब्रुस ली आणि विटा तोडण्याचे दिवस

|| श्री ||
ब्रुस ली आणि विटा तोडण्याचे दिवस
( कराटे किंग , अभिनेता ब्रुस लीचे आज पुण्य स्मरण )
तारुण्याच्या दिवसात अचाट , अफाट कार्य करणारी कुणी व्यक्तिमत्वे दिसली की मी मनोमन त्या व्यक्तिमत्वाच्या पायावर लोटांगण घ्यायचो नुस्त लोटांगण नाही तर त्याच्या त्या कार्याला आत्मसात करण्याचा प्रयत्नही मनोमन करायचो. अशी कितीतरी व्यक्तिमत्वे अधूनमधून माझ्या अंगात संचारायची . त्यापैकीच एक म्हणजे ब्रुस ली.
ब्रुस ली बद्धल मी फार काही सांगण्याची गरज नाही. कराटे, कुंग फु या मार्शल आर्ट कलेला जगभर जी प्रसिद्धी मिळाली ती खऱ्या अर्थाने ब्रुस ली या नावाने. तेंव्हा टिव्ही नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रातून येणारे ब्रुस ली चे फोटो आणि चित्रपटांच्या जाहिराती हाच केवळ त्याच्या दर्शनाचा भाग होता.
मुंबईच्या मावशीची कराटे क्लासला जाणारी मुले सुट्टीत पंढरपूरला आल्यावर माझ्यासमोर खूपच शायनिंग मारायची. कराटेच्या वेड्या वाकड्या उडया मारून दाखवायची. हाताने विटा फोडायची. मलाही कराटे शिकवतो म्हणत जोरदार फटके मारायची. असो....
एक वर्ष बृसलीच्या चित्रांच्या वह्याही बाजारात आलेल्या होत्या. ब्रुस लीचे खूप सुंदर फोटो होते त्या वह्यांवर. माझ्या घरच्यांनी मात्र अश्या वह्या मला घेऊन दिल्या नाहीत. " काय तो उघडा अवतार , काय त्याच्या झिपर्या " असा शेरा घरच्यांनी मारला.
साधारण ७ वी इयत्तेत असताना ब्रुस लीचा " इंटर द ड्रेगोन " चित्रपट पंढरपुरात अकबर टोकीजला आला होता तेंव्हा अगदी उडया मारत आम्ही काही मित्र हा चित्रपट बघायला गेलो मात्र या चित्रपटाला A म्हणजे प्रौढांसाठी हे प्रमाणपत्र असल्याने आम्हा त्या मानाने लहान वाटणाऱ्या मंडळींना आत प्रवेश नाकारण्यात आला. त्यावेळी मला बृसलीप्रमाणे हु ... हा ... करत , आम्हाला आडवणाऱ्या त्या डोअर किपराला चार कराटेचे फटके आणि लाथा घालाव्या वाटल्या होत्या पण ते शक्य नव्हते. तो डोअर कीपर भलताच अडदांड होता. नेमके आमच्या ओळखीचे एक मोठे अधिकारी चित्रपट बघायला आलेले होते त्यांनी आम्हाला सोडायला त्या डोअर किपरला सांगितले आणि आम्ही डोळे आणि तोंड वासून " इंटर द ड्रेगोन " बघितला.
दुसऱ्या दिवसापासून मी कराटेची तयारी सुरु केली.
पहिल्यांदा जाऊन स्टेशन रोडवर असणाऱ्या जाधव बुक स्टालं मधून " महिन्यात शिका कराटे" हे पुस्तक आणलं. कव्हरवर असणारा ब्रुस लीचा फोटो मी आदराने घराच्या भिंतीवर चिकटवला आणि त्याच्या समोर पुस्तकातले कराटेचे व्यायाम प्रकार करायला सुरुवात केली. पहील्या दिवशी उत्साहाने केलेल्या व्यायामाचा परिणाम असं झाला की पुढचे ४ ते ५ दिवस अंथरुणातून उठायचे अवघड झाले होते आणि वर्गात बाकावर नीट बसता येत नव्हते. विटा हाताने फोडण्याचा प्रयत्नही अससाच काही दिवस त्रासदायक ठरला. कराटे शिकण्याचे हे वेड चांगले वर्षभर टिकले आणि मग अचानक क्रिकेटने आमच्या आयुष्यात प्रवेश केला. क्रिकेटच्या वेडाने मात्र आमच्या आयुष्यातली बरीच वर्षे आणि वेळ वाया घालवला. असो.. तर अश्या या बृसलीचा आज स्मरण दिन .. त्याच्या अफाट अचाट कार्याला सलाम...
श्याम सावजी .. पंढरपूर

Tuesday, July 2, 2019

आषाढाचा पहिला दिवस आणि माझे पहिले आकर्षण ! .......................

|| श्री ||
............आषाढाचा पहिला दिवस आणि माझे पहिले आकर्षण ! ...............................
आषाढाचा पहिला दिवस म्हणजे कालिदासाच्या अजरामर " मेघदूताच्या " आठवणीचा दिवस . आषाढ आणि श्रावणाचे प्रफुल्लीत दिवस मनामनावर गारूड न करतील तर नवल. यक्षाप्रमाणे जवळपास सगळ्यांचीच या दिवसात विरही अवस्था होतेच होते . माझीही पहिल्यांदा अशी अवस्था झाली ते दिवस मला चांगले आठवतात . तेंव्हा मी ५ वीत असेन . हिंदी गाण्यांचे शब्द थोडे थोडे कळायला लागले होते . " कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है ! " सारखी गाणी तेंव्हा रेडिओवर जोरात धुमाकूळ घालत होती . त्यांचा काही प्रमाणात तरी परिणाम आमच्यावर होतंच होता ..त्यात एक दिवस ती दिसली . शाळेच्या मैदानातच . कोण ?, कुठली ? कितवीत आहे ? काहीच माहित नाही पण आवडली . मग रोज नजर तिला शोधायला लागली . कधी दिसायची कधी नाही . ती दिसली कि " कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है " हे गाणं आठवायचं . आणि हे गाणं ऐकलं कि ती आठवायची . देवळाच्या परिसरात मी इंग्रजीसाठी शिकवणी लावली होती . या शिकवणीवरून परतताना एकदा अचानक ती तिथे दिसली . काही जणींच मिळून दोरीवरच्या उड्या मारणं सुरु होतं .
 " अरेच्चा हि इथे राहते काय ! " 
आता मी शिकवणीला जाताना आणि परतताना ती दिसतेय का बघायला लागलो .मंदिराच्या त्या परिसरात उदबत्त्यांची खूप दुकाने होती त्यामुळे वातावरणात एक धुंद सुगंध भरलेला असायचा . त्यात ती दिसली कि वातावरण आणखी धुंद व्हायचा . पण बरेचदा निराशाच पदरी यायची . एकदा अचानक ती माझ्या शिकवणीतच दिसली आणि तेंव्हा समजलं कि ती ७ वीत आहे . म्हणजे माझ्या पुढे २ वर्षे . म्हणजे मी तिच्या पेक्षा २ वर्षे लहान होतो. माझा विरस झाला . पण तरी तिचं आकर्षण कमी झालं नाही . ती दिसावी असं कायम वाटायचं. नंतर ती तिच्या वर्ग मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना दिसायला लागली . " कभी कभी " मध्ये शशी कपूरची राखीच्या आयुष्यात एन्ट्री झाल्यावर अमिताबची जशी अवस्था होते तसं काहीसा माझं झालं. तिच्या लेखी मी कुठेच न्हवतो . माझ्याही ते लक्षात आलं . एक निराशेची भावना मनात आली आणि मी देवळाच्या त्या भागात जायचं बंद केलं . योगायोगाने ती शिकवणी बंद करून मी घराजवळच्या दुसऱ्या एका शिकवणीत जायला लागलो . आणि काही दिवसांनी चक्क तिला विसरून गेलो. नंतर तीही कधी दिसली नाही . पण आजही देवळाच्या परिसरातून जाताना उदबत्त्यांचा तो धुंद सुवास जाणवला कि ती आठवून जाते तशीच दोरीवरच्या उड्या मारताना दिसलेली . ............................श्याम सावजी ....पंढरपूर
 —

Saturday, June 15, 2019

वट पोर्णिमेचा तो गोळीबार

|| श्री ||
वट पोर्णिमेचा तो गोळीबार 
वट पोर्णिमा म्हटलं कि मला माझ्या लहानपणी पंढरपुरात घडलेली एक विचित्र घटना आठवते . मी साधारण सहावी सातवीला असेन . पंढरपुरातील गजानन महाराज मठा समोरील रस्ता जो मंडईकडे जातो त्या ठीकाणी पूर्वी मोकळी जागा होती आणि त्या जागेत एक वडाचं झाड होत. वट पोर्णिमेला या झाडाला पुजायला महिला गर्दी करत असत . त्या दिवशीही महिलांची गर्दी झालेली होती . वडाची पूजा करण्यात महिला गुंग होत्या आणि अचानक एका गाडीतून काही व्यक्ती आल्या आणि त्यांनी हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. क्षणभर कुणालाच काही समजलं नाही . मग मात्र किंकाळ्या फोडत महिलांची धावपळ सुरु झाली., त्या व्यक्तींनी एका महिलेला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि पळ काढला.
हा हा म्हणता हि बातमी पंढरपुरात वाऱ्यासारखी पसरली . हातातलं काम टाकून जो तो या वडाच्या झाडाकडे धावायला लागला. तर्क वितर्क सुरु झाले. अचानक या सणावर भीतीचं सावट पसरलं. पंढरपुरातले रस्ते त्या वडाच्या झाडाकडे जाणाऱ्या बघ्यांच्या गर्दीने फुलून गेले.
संध्याकाळी मी पण घरच्यांबरोबर त्या गोळीबाराच्या जागेला भेट दिली . त्या झाडाजवळ जत्रेचं स्वरूप आलं होत . लोक झाडाच्या फांद्यांकडे बोट दाखवत “ ते बघा गोळ्या तिथे घुसल्यात ” असं म्हणून दाखवत होते . मला काहीच दिसत न्हवतं.
दर वर्षी वट पौर्णिमेच्या दिवशी पंढरपुरात घडलेला हा थरार आठवून जातो
श्याम सावजी .. पंढरपूर