|| श्री ||
............मुळात माळवदावर मी
सगळ्यांच्या पाठीमागून जायचो. आणि वर गेल्यावर शक्यतो या कोपऱ्याकडे पाठ करून
बसायचो. पण काहीही केलं तरी या कोपऱ्याकडे लक्ष जायचंच आणि ती केस मोकळे सोडलेली
स्त्री आठवायचीच. कंदिलाच्या पिवळसर उजेडात माळवदावरचं वातावरण जास्तच गूढ झालेले
असायचे. आमच्या पूर्व दिशेच्या बाजूच्या माळवदावर दोन तीन कुटुंबे झोपायला असत.
जहांगीर पिरजादे हा माझ्याच वयाचा मुलगा , त्याचे आज्जी ,आजोबा , घोडकेंच्या आज्जी
आणि त्यांचा मुलगा. आणखी काही माळवदे पलीकडे होती आणि त्यावरही माणसांची चाहूल
असायची . घोडके आज्जींचा मुलगा सोबत रेडीओ घेऊनच यायचा. त्याच्या रेडिओवरची गाणी
रात्री उशिरापर्यंत ऐकू यायची. वातावरणात तो एक रम्य दिलासा असायचा. माळवदावर
जमलेली ही शेजारपाजारची मंडळी एकमेकांशी गप्पा मारत बसायची तेंव्हा त्या गप्पा
ऐकताना मन आनंदी व्हायचं आणि सुरक्षित वाटायचं. कधी आभाळात चांदण्यांचा सडा पडलेला
असायचा तर पावसाळी दिवसात ढगाळ वातावरणही असायचं. अंथरुणावर पडल्यापडल्या आकाशीचा
चंद्र ढगातून लपाछपी करताना बघायला खूप मस्त वाटायचं. तेंव्हा चंद्र खूप लोभस
वाटायचा. पावसाळ्याच्या दिवसात किंवा मे
महिन्यात कधी अवकाळीचा पाऊस आला तर आमची म्हणजे माळवदावर झोपण्यासाठी आलेल्या
मंडळींची खूप गडबड उडायची. आमची अंथरुणे पांघरुणे आम्ही भराभरा अंगणात टाकायचो.
आणि मग खाली जाऊन घरात झोपायचो. हा खूप त्रासदायक प्रकार असायचा.
लोकमान्य
विद्यालयाच्या बाजूची म्हणजे आमच्या घराची पश्चिम बाजू , या बाजूलाच आमच्या गल्लीचा
रस्ता आणि आमच्या घराचे दार होते. लोकमान्य विद्यालयाच्या उंच आणि ऐसपैस दगडी
भिंतीने आमचा पश्चिम भाग पूर्ण व्यापलेला होता. दुपारी ३ नंतर या इमारतीची सावली
आमच्या घरावर किंवा गल्लीवर पसरायला सुरुवात व्हायची ती अगदी दुसऱ्या दिवशी सकाळ होई
पर्यंत. रात्री या भव्य इमारतीची आकृती भेसूर वाटायची . या इमारतीच्या आत अंगणात
असलेले पिंपळाचे झाड खूपच उंच होते. ते कौलावरून वर आभाळात पसरले होते. याची पाने
रात्रभर सळसळत असायची शिवाय याच्या वस्तीला असलेले काही पक्षी मधूनच चित्र विचीत्र
आवाज काढायचे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडक्या आमच्या माळवदाच्या अगदी
समोर यायच्या. दुर्दैवाने बहुतेकवेळा या खिडक्या उघड्या असायच्या. रात्री जरा
जोरात वारा सुटला की या खिडक्या धडाधड आदळायच्या. नेमकी या वेळी जाग यायची आणि मग
खूप भीती वाटायची. कधीकधी या उघड्या खिडक्यातून कुणीतरी डोकाऊन आपल्याकडे बघतय का
काय असा भास व्हायचा. या शाळेतल्या भूतांचे मित्रांनी सांगितलेले काल्पनिक किस्से
आठवायचे. ते कीस्से नंतर मी सांगणार आहेच . मग मी डोक्यावर पांघरून ओढून घेऊन
झोपायचा प्रयत्न करायचो पण मग तर जास्तच भीती वाटायची. ते चेहरे डोळ्यासमोर दिसतंच
राहायचे.
कधी गस्त घालणाऱ्या रामोशी
काकांच्या हाकेने जाग यायची. कधी मी जागाच असायचो आणि दूरवरून रामोशी काकांची हाळी
ऐकू यायची. त्या पाठोपाठ त्यांच्या काठीचा जमिनीवर आपटलेला आवाज ऐकू यायचा. ते
जसजसे जवळ येत जात तसतशी त्यांच्या हाळीतली जरब जाणवायची. त्यांच्या हाकेला गल्लीतल्यांनी
दिलेले प्रत्युत्तर ऐकू यायचे. आमच्या घराजवळून ते जाताना त्यांच्या पायातल्या
चपलांचा करकर आवाज पण ऐकू यायचा. हे रामोशी काका मला या रात्रीच्या गूढ वातावरणात
खूप मोठा दिलासा वाटायचे. असं वाटायचं की यांनी रात्रभर आमच्या गल्लीतच फिरत
राहावं. अश्याच अस्वस्थ अवस्थेत असताना कधीतरी डोळा लागायचा.
पहाटे पहाटे गार वाऱ्याने
साखरझोपेतून जाग यायची. अगदी अंधुक प्रकाश पसरलेला असायचा. कुठल्या कुठल्या
मंदिरातल्या घंटांचा आवाज ऐकू यायचा. गल्लीतले रेडीओपण सुरु झालेले असायचे.
कष्टकरी लोकांची ही गल्ली असल्याने गल्लीत लौकर जाग असायची. समोरच्या पिंपळावर
पोपटांचा थवा गोंधळ घालत बसलेला असायचा. रात्रीची ती निशब्द शांतता आता संपलेली
असायची. माझ्याही मनावरचं भीतीचं सावट पसार झालेलं असायचं. घरचे बाकीचे सदस्य खाली
गेलेले असायचे. मग मीसुद्धा अंगावरचं पांघरूण फेकून देत जिना उतरायला सुरु
करायचो ( समाप्त ).... श्याम सावजी.. पंढरपूर