Wednesday, May 1, 2019

चाफा


|| श्री ||
चाफा .....
" चाफा बोलेना...चाफा चालेना ..चाफा खंत करी काही केल्या फुलेना . " अशी एक कवी “ बी ” उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता आहे .पूर्वी शालेय अभ्यासक्रमात ती आम्हाला होती .लता मंगेशकरांनी आपल्या मधुर आवाजात तिला गाऊन अजरामर करून टाकले . कवींचा चाफा का बोलत किंवा फुलत न्हवता हे कविंनाच माहित . कदाचित तो त्यांची मानसिकता प्रकट करत असावा . पण माझ्या सासरच्या वाड्यातला चाफा मात्र चांगला बोलका आणि भरगच्च फुलणारा आहे .दिवस रात्र याच्या फुलांचा सडा आमच्या वाड्याच्या अंगणात पडत असतो .सगळे अंगण पांढऱ्या फुलांनी भरून गेलेले असते .हि फुलं पायाखाली येऊ नयेत म्हणून मी वेळ मिळेल तेंव्हा गोळा करून बाजूला ठेवत असतो मात्र याच्या फुलांचा वर्षाव दिवसभर सुरूच असतो..मला तर तो आनंदाचा वर्षाव वाटतो. घराला विस्तीर्ण अंगण असावे आणि त्या अंगणात एखादे तरी डेरेदार झाड असावे हे माझे जुने स्वप्न . ते माझ्या या सासरच्या वाड्यात पूर्ण होते .
आमच्या वाड्यातले हे चाफ्याचे झाड खूप जुने आहे . १९५६ च्या महापुरात याचे रोप लावल्याची आठवण सांगितली जाते .मला मात्र याच्याकडे बघितल्यावर तो या वाड्याचा वास्तुपुरुष असल्यासारखे वाटते . पर्वा मी याच्या भोवतीने पार बांधून घेतला . आमच्या वाड्यातली लहान मुले या पारावर आपला खेळ मांडतात आणि खेळात रंगून जातात .दिवाळीतला किल्लाही याच पारावर उभा केला जातो . याच्या सावलीत दुपारच्या वेळी बसणे हा  आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभूतीचा सोहळा ..पर्वा वाड्याची एका बाजूची डागडुजी करताना एक लहानसा नंदी आणि त्याला जोडून महादेवाची पिंड अशी मुर्ती सापडली . ती मी या पारावरच ठेवली . आता वाड्यातल्या स्त्रिया याच्या समोर सकाळी रांगोळी काढतात आणि रात्री दिवा लावतात त्यामुळे पाराची शोभा वाढली आहे ..वाड्यात आल्यावर आणि बाहेर जाताना याच्या बुंध्यावर डोके टेकवूनच मी पुढे जातो.
सकाळी कोवळ्या उन्हात आणि रात्री चांदण्याच्या प्रकाशात या चाफ्याची पांढरी फुले अगदी उठून दिसतात .खास करून रात्री चंद्र प्रकाशात यांचे सौंदर्य उजळून निघते . दिवस भर पक्षांचा याच्यावर वावर असतो . मध्य रात्री कधी जाग आली आणि अंगणात बघितले कि हा एखाद्या पहारे-यासारखा उभा दिसतो " मी जागा आहे काळजी करू नकोस " असेच जणू हा सांगत असतो . तशी आमच्या वाड्यात अशी जुनी विस्तीर्ण आणखी २ झाडे होती मात्र डागडुजी करताना त्यांना काढावे लागले .
आता आमच्या या जुन्या पुराण्या १५० वर्षांपूर्वीच्या वाड्याचे नुतनीकरण करायचे नियोजन सुरु आहे सगळे जुनेपण जाणार .पण मी आणि माझी बायको मात्र या चाफ्याला कसे वाचवता येल या विचारात आहोत ....................श्याम सावजी ........पंढरपूर

2 comments:

  1. खुप सुंदर शब्द, झाडाफुलांची भावना !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाग्येश भाऊ .. आनंद वाटला

      Delete