Monday, November 18, 2019

व्ही शांताराम यांचा “ झुंज ” आणि “ पिंजरा ”


|| श्री ||
" झुंज " आणि " पिंजरा "
व्ही शांताराम बापूंचे बरेच चांगले चित्रपट मला बघायला मिळाले ते अगदी शाळकरी वयात आणि याचं श्रेय जातं ते माझ्या आईला ....अगदी लहान वयापासून वाचनाची किंवा दर्जेदार चित्रपट निवडून बघायची चोखंदळ नजर तिने माझ्यात निर्माण केली. ( आता ती नजर मला राजस आणि रथिनमध्ये निर्माण करायची आहे. )  “ दो आंखे बारा हाथ ”, “ नवरंग ”, “ झनक झनक पायल बाजे ”, “ गीत गया पत्थरोने ”. “चानी “, “ झुंज “ , “ पिंजरा ” “ संत तुकाराम “ “ गोपालकृष्ण ” असे त्यातले काही चित्रपट. या पैकी पिंजरा आणि झुंज हे दोन माझे अत्यंत आवडते चित्रपट. “ पिंजरा “चा शेवट मला आवडला नाही हेही कबुल करतो. म्हणजे मी दिग्दर्शक असतो तर चित्रपटाच्या शेवटी मास्तर आणि त्या मैनाचे लग्न लाऊन दिले असते. पिंजरा मधल्या मास्तर आणि तमासगीर मैना यांचा संघर्ष हा मला अत्यंत कलात्मक वाटतो. अगदी ग्रेट कल्पना म्हणावे असा. प्रत्येकाची आपापली काही तत्वे, संस्कार असतात आणि ते घेऊन माणसं या जगात वारतात त्यातून प्रसंगी त्यांचा सामना होतो आणि मग ठिणग्या उडतात. कधी कधी या ठिणग्या फुलबाजीच्या आतीश्बाजीसारख्या मोहक असतात. त्यांचा चटका बसत नाही. या ठिणग्यांकडे , या आतशबाजीकडे एकटक बघत राहावं असं वाटतं. “ पिंजरा ” हा चित्रपट असाच एका तत्वाला उराशी कवटाळून बसलेल्या मास्तरची आणि आपल्या जन्मजात देणगी मिळालेल्या कलेवर निष्ठा ठेऊन ती कला हेच देवत्व मानणाऱ्या तमाशा नर्तकीच्या संघर्षातून निर्माण झालेल्या आतषबाजीची कथा आपल्यासमोर मांडतो. एकापेक्षा एक सुंदर गीते, लावण्या, गण, गवळणी यांच्या माध्यामातून व्ही. शांताराम यांनी हि आतषबाजी , हे सौदर्य अफलातून टिपलेलं आहे. मास्तर आणि मैना यांच्यामधला हा संघर्ष आपल्यासमोर जीवनाचे अनेक पदर उघडत जातो. जगण्याची नवी परिभाषा मनात तयार करत जातो. मनावरचे कितीतरी ताण काढून टाकतो मात्र शेवट पुन्हा आपल्याला खट्टू करतो. निदान मला तरी.  
“ झुंज ” हा शांताराम बापूंचा आणखी एका चित्रपट माझा अत्यंत आवडता. दलित आणि सवर्ण प्रश्नावर किंवा संघर्षावर आधारित माझ्या पाहण्यातला हा सर्वात सुंदर चित्रपट. अतिशय संवेदान्शैल असलेला हा विषय शांताराम बापूनी रुपेरी पडद्यावर खूपच सुंदरपणे हाताळलाय. माझी आवडती मराठी कलाकारांची जोडी रवींद्र महाजनी आणि रंजना हे यात असले तरी यातले कांबळे मास्तर मला खूप आवडून गेले. “ झुंज ” मधली गाणी खरंच खूप सुंदर आहेत. त्यातल्या त्यात “ निसर्गराजा ऐक सांगतो ” हे तर आजही प्रसिद्ध आहे. उच्च वर्णीय इनामदार त्यांची गावावरील हुकुमशाही. त्यात दलीतांबद्धल असलेला तिरस्कार मात्र या इनाम्दाराचा उच्चशिक्षित आणि पैलवान असलेला तरुण मुलगा सर्व सामान्य माणसे, दलित, पिडीत यांच्या बाजूने असणारा आणि त्यातून इनामादाराचे घर आणि गाव यात उद्भवलेला संघर्ष . “ झुंज ” चा शेवट मात्र व्ही. शांताराम यांनी अगदी सुखांत दाखवला होता. किमान माझ्यासारख्या शेवट गोड व्हावा या मताच्या माणसासाठी आनंदाची गोष्ट होती.
सांगायचा मुद्दा हा कि व्ही शांताराम हे नाव कानावर पडले कि मला त्यांचे हे दोन नितांत सुंदर चित्रपट आठवतात आणि आठवत राहतील.......  श्याम सावजी ..  पंढरपूर