|| श्री ||
पुराच्या
वेढ्यातले २ दिवस २ रात्री
चंद्रभागेचा
पूर आता बराच ओसरला आहे. घाट जवळपास रिकामे झाले आहेत. गेला आठवडाभर सुरु असलेला
पुराचा थरार आता संपत आला आहे किंवा संपल्यात जमा आहे. पण २ दिवस त्या पूरस्थितीने
आमची केलेली अवस्था काहीशी अडचणीची झाली.
५ तारखेपासून पाण्याने घाटांच्या पायऱ्यांशी
स्पर्धा सुरु केली आणि ७ तारखेला पाणी घाट ओलांडून गावात शिरले. तसे गटारी, धबधबे यांच्या
माध्यमातून आधीच गावात आले होते. चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱ्या शेगाव
दुमाला गावात स्पीकरवरून दवंडी दिली जात होती. सावधगिरी बाळगा पाणी वाढत आहे असे
ते सांगत होते.
७ तारखेला बुधवारी आमच्या कासार घाटाच्या सर्व
पायऱ्या पाण्यात बुडाल्या आणि आमच्या वाड्याच्या उत्त्तर दारातून पाणी वाड्यात
शिरले. सकाळी ८ वाजता विद्युत पुरवठा बंद झाला आणि आमची परीक्षा सुरु झाली. इतक्यात लाईट
जाईल याचा अंदाज नसल्याने मोबाईल वगैरे चार्ज करण्यात आमची हयगय झाली आणि तासाभरात मोबाइलं कोमात
गेला. TV बंद झालेला होताच. सतत करमणुकीला चटावलेला मी काहीसा कावराबावरा झालो. पॉवर
सेव्हरही साथ देत नव्हता.
आमच्या सज्जातून
चंद्रभागेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार मंडळी यायला लागली. त्यांच्याशी गप्पा टप्प्पात
काही वेळ मजेत गेला. ओळखीचे काही नागरिकही पाणी बघण्यासाठी आणि त्या पाण्यासोबत
छायाचित्र काढून घेण्यासाठी घरी गर्दी करायला लागले. या सगळ्यात वेळ छान गेला पण
रात्री काय होणार याची चिंता होतीच. तोही प्रश्न सुटला. पाणी बघण्यासाठी आलेल्या
कल्पक कोठाडिया या आमच्या मित्राला आमच्या परिस्थितीची जाणीव झाली आणि त्याने
त्याच्या दुकानातली ग्यासबत्ती फुल्ल करून पाठवून दिली. त्यानंतर दुपारी आणखी काही
मित्र आले ज्यांनी मेणबत्त्या, काडे पेट्या, चार दिवस पुरतील असे टिकाऊ खाद्यपदार्थ आणले.
ते मित्र म्हणजे डॉं. प्राजक्ता बेणारे, मुन्ना शेख , मनोज दाते, पार्थ बेणारे, निमा भिंगे इत्यादी. मनोज दातेने त्याच्याकडचा पॉवर सेव्हर आणून दिला
पण माझा मोबाईल त्याला कनेक्ट होईना. गल्लीतल्या कोकाटेंनी त्यांचा सौर उर्जेवर
चालणारा चार्जर दिला त्यावर कसे बसे ३० % चार्गिंग झाले. डॉं. सुळे यांनी काही
अत्यावश्यक औषधांचा साठा करून दिला. एकंदर मित्रांच्या मदतीने आम्ही पूर
परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झालो.
वाडा सोडायचा
नाही हे आमचे पक्के ठरले होते. यापूर्वीचे बरेच पूर माझ्या सासरच्या मंडळींनी या
वाड्यातच राहून संपवले आहेत . वाड्यात कंबरे एवढे पाणी असताना
त्यांनी पुरात १० दिवस काढले आहेत. त्यामुळे त्यांना फारशी चिंता वाटतं नव्हती पण
माझा मात्र पुरात या वाड्यात राहण्याचा पहिलाच अनुभव. त्यात राजस , रथिन यंदा
सोबत. पूर्वेकडच्या ग्यालरीचा भाग बराच दुबळा झालेला.
तर एकदाची
संध्याकाळ झाली आणि आम्ही ग्यासबत्ती पेटवली. एक गूढ वातावरण वाड्यात तयार झाले.
वाड्यातल्या ४ कुटुंबियांपैकी एक कुटुंब पाण्याच्या आणि पाण्याबरोबर येणाऱ्या साप -आणि
इतर किटकांच्या धास्तीने वाडा सोडून गेले होते. इतर २ कुटुंबांनी त्यांचे महत्वाचे
सामान वरच्या मजल्यावर आणून टाकले होते. आमचा तर मुक्कामच वरच्या मजल्यावर. पाठीमागे पाणी पातळी वाढत होतीच. वाळवंटातले
लाईट बंद झाल्याने फक्त पाण्याचा आवाज ऐकू येत होता. नदी पात्रापलीकडेच्या शेगाव दुमाला
गावातील सार्वजनिक दिवे , म्हसोबा देवस्थान, हरेकृष्ण घाट, प्रभुजी बैठक या ठिकाणी
असणाऱ्या दिव्यांचा अंधुक उजेड फक्त वाळवंटात पाण्यावर दिसत होता. कोळी लोकांच्या
नावा कासार घाटाच्या अगदी वरच्या पायरीला थडकत होत्या. बघ्यांची गर्दी घाटावर वाढत
होती.
रात्री ८ वाजता
गल्लीतल्या काहीजणांनी जेवणाचे डबे आणले आणि आम्ही एकत्र जेवण केले. मग गप्पा
रंगल्या. या पूर्वीच्या पुरांच्या आठवणी रंगत गेल्या. डासांचा त्रास चांगलाच वाढला होता. मग त्यांची
सोय म्हणून कासव छाप, ओडोमास वगैरे साहित्य आणावे लागले. या सगळ्यात राजस , रथीनची
साथ महत्वाची होती. आहे या परिस्थितीत पोरं खेळून झोपी गेली. आम्हीपण शेवटी ११
वाजता झोपेच्या स्वाधीन देह केला. अर्थात रात्रभर अधून मधून उठून पाण्याचा , पूर
स्थितीचा अंदाज घेणे सुरूच होते. कोळी बांधवांच्या नावा आमच्या वाड्याच्या भिंतीला
टेकल्या होत्या. त्यातील नावाडयांच्या गप्पा सोबत बरेचजण असल्याची जाणीव करून देत
होत्या. त्यांच्या मोबाईल वरील गाणी वातावरणातला तणाव कमी करत होती.
दुसरा दिवस
म्हणजे गुरुवार ८ ऑगस्ट आधल्या दिवसाप्रमाणेच गेला. चंद्रभागा आता गल्लीत शिरली
होती. कासार घाटावरून वर आलेले पाणी आणि चंद्रभागा घाटावरून आलेले पाणी यांचा
मिलाप आमच्या गल्लीत खरे वाड्यासमोर झाला आणि खऱ्या अर्थाने आमची गल्लीतील पूर्व
दिशेकडील आमचे कपोल निवास, बबन जोशीचे घर, रामदास मठ, साखरे महाराज मठ, खरे वाडा,
रुमालावाला धर्मशाळा या वास्तू चारीबाजुनी पाण्याने वेढलेले बेट बनल्या. माझी
मोटारसायकल मी कशीबशी वाडयात घेतली. आजचाही दिवस पाणी बघायला येणार्या मंडळीच्या
वर्दळीत आणि त्यांच्याशी गप्पा टप्पा यात गेला. आज वर्तमानपत्रही आले नाही
त्यामुळे बाह्य जगाशी संपर्क तुटल्यासारखा झाला. वाड्यातल्या मोहोळकरांचा
ट्राझिस्टर रेडीओ हा बातम्या वगैरे ऐकण्यासाठी आधार होता. कालच्या प्रमाणेच आजचीही
रात्र मेणबत्त्या आणि ग्यास बत्तीच्या उजेडात सरली.
शुक्रवारी ९
तारखेला सकाळी चंद्रभागा कासार घाटाच्या निम्य्यावर गेल्याचे समजले आणि हायसे
वाटले. १२ वाजेपर्यंत पूर बराच ओसरला. काही वेळाने लाईटही आले आणि आम्ही सुटकेचा
निश्वास सोडला.
...........................श्याम
सावजी.. पंढरपूर