|| श्री ||
होळीचा दिवस
ढमा ढमा करून दिमड्या वाजायला लागल्या कि लक्षात यायचं कि होळी जवळ आलीय . आमच्या गल्लीतला परट चा आबा दिमडी झकास वाजवायचा . ” गीडगी नांग ...गीडागी नांग ” करून चौकात उभा राहून तो दिमडीवर ठेका धरायचा आणि आम्ही गल्लीवाले मित्र घराबाहेर येउन त्याच्या भोवती घोळका करायचो . मला मात्र आयुष्यात दिमडी तालात वाजवायला कधीच जमली नाही . तेंव्हा बाजारात कातड्याच्या दिमड्या होळीच्या आधी दहा ते पंधरा दिवस यायच्या . आता फायबरच्या छोट्या डफल्या किंवा ढोलक्याच मुलं जास्त खरेदी करत आहेत .
नव्या पेठेत आणि भादुले पुतळ्याजवळ या दिमड्यांचा बाजार भरायचा . या दिमड्यावर चित्रपटांची नावं लिहिलेली असायची . " सरगम " चित्रपट गाजला तेंव्हा त्यातल्या नायकाच्या हातात डफली असल्यानं " सरगम " नाव लिहिलेल्या दिमड्याना त्या वर्षी खूप मागणी होती . आणि ती दिमडी वाजवताना जोतो स्वतःला " सरगम " चित्रपटातला ऋषी कपुरच समजायचा . “ एकता जीव सदाशिव ”, “ सोंगाड्या ” , “ नाव मोठं लक्षण खोटं ” अश्या मराठी सिनेमाची नावे असलेल्या पण दिमडया मिळायच्या. दिमडी आणल्या नंतर ती वाजवायला चांगलं टिपूर आम्ही शोधायचो. गल्लीत काही गवळ्यांची घरे असल्यानं त्यांच्या गाई म्हशी समोर पडलेल्या चगाळातून आम्ही एखाद जाडजूड कांडकं शोधून काढायचो. मग त्या कांडक्याच्या तोंडावर लावण्यासाठी डाम्बराचा गोळा बनवायचो. अर्थात यासाठी गल्लीतला रस्ता बराच वेळ उकरत बसायचो. एकदाची हि तयारी झाली कि मग ढमा ढमा करून आमच्या दिमडया वाजायला लागायच्या. दुपारच्या वेळी दिमडया वाजवायला आम्हा मुलांना घरून परवानगी नसायची कारण त्यावेळी बहुतेक सर्व घरातून वामकुक्षी सुरु असायची. दिमडीचं कातड पोळंवल्यावर ती जास्त चांगली वाजते असं काही जणांनी सांगितल्यानं आम्ही मुलं घरातून कागद आणि काडेपेट्या पळवून आणायचो आणि मधून मधून आपापली दिमडी तापवायचो .
आमच्या गल्लीची होळी जिथ पेटायची तिथ रस्त्याच्या कडेला एक उभा दगड होता म्हणजे अजूनही आहे . तो दगड होळीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी आमच्या गल्लीतले श्रीधर तात्या शेंदारानं रंगवायचे . हा म्हसोबा आहे आणि तो खूप कडक आहे अशी चर्चा आम्हा लहान मुलात तेंव्हा रंगायची . होळी पेटवण्यापुर्वी ह्या शेंदूर फसलेल्या दगडाची विधिवत पूजा केली जायची , त्याला हार घालून त्याच्या समोर नारळ फोडला जायचा . श्रीधर तात्या वारल्यापासून या दगडाला शेंदूर लागलेला नाही किंवा त्याची पूजा करण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही . आता त्या जागी होळीच होत नाही
आमच्या गल्लीतल्या होळीला आमच्या घरून एक मोठ ओंडकं विकत घेऊन देण्याची पद्धत होती . एका बैल गाडीतून हे ओंडकं लाकडाच्या अड्ड्यातून आणलं जायचं . ओंडकं आमच्या तर्फे दिलं जाणार असल्यानं या बैल गाडीत बसण्याचा माझा रुबाब असायचा . दुपारी साधारण चार पाच च्या दरम्यान आम्ही गल्लीवाले ओंडकं आणायला निघायचो. ज्ञानेश्वर मंडपाच्या जवळ आताच्या शहाणे सराफांच्या घरासमोर त्यावेळी माळी यांचा लाकडाचा अड्डा होता . फेटा बांधलेले एक पैलवान गृहस्थ या अड्ड्याचे मालक होते . या अड्ड्यात गेल्यावर सगळीकड लाकडाचा वास भरून उरलेला असायचा . गल्लीतली तरुण मुलं एक मोठालं ओंडकं निवडून बैलगाडीत टाकायची आणि आमची बैलगाडी ते घेऊन होळीच्या जागेवर यायची . तो पर्यंत सडा रांगोळी करून होळीची जागा महिलांनी सजवलेली असायची . त्या जागी तो मोठा ओंडका स्थापन करून त्याच्या भोवती इतर लहान मोठी लाकड आणि गव-या रचल्या जायच्या . हि सगळी तयारी गल्लीतली तरुण मंडळी करायची . आम्ही लहान मुलं फक्त लांबून हा नजारा बघायचो आणि आमच्या हातातल्या दिमडया ढमा ढमा करून बडवायचो. मग रीतसर पूजा अर्चा करून होळी पेटवली जायची आणि तोंडावर पालथी मुठ आपटत बेंबीच्या देठापासून बोंबलायचा कार्यक्रम सुरु व्हायचा तो अगदी रात्रीचे दहा अकरा वाजे पर्यंत चालायचा . हा माझ्या साठी खूपच थरारक , नं भूतो असा प्रकार असायचा . एरव्ही आम्हाला उपदेशाचे डोस शिकवणारे , तोंडानं वाईट बोलू नये म्हणून सदा न कदा आम्हाला डाफरणारे म्हातारे कोतारे , बुजुर्ग सुध्धा खच्चून बेंबीच्या देठापासून बोंबा मारत दुसऱ्याची आई बहिण काढायचे. सुरुवातीला लाजत लाजत बोंब ठोकणारा मी नंतर नंतर मित्रांच्या संगतीने जोरात बोंब ठोकायचो ..दिमड्यांचा गोंगाट टिपेला पोहोचायचा . होळीच्या ज्वाला उंचावरच्या लाइटच्या तारांना स्पर्श करायचा प्रयत्न करायच्या . मधुनच आम्ही गल्लीतली मुलं सायकलवर किंवा पायी जाऊन गावातल्या जवळपासच्या होळ्या बघून यायचो . त्या वेळी घरात टी व्ही वगैरे नसल्याने लोक घरात जायचेच नाहीत . होळीचा हा नजारा बघत आपापल्या दारात बसायचे किंवा गावभर फिरायचे.
रात्री होळीसमोर चिवडा केला जायचा . त्यावर सगळे ताव मारायचे . त्यावेळी घरांना संडासाचे दरवाजे बाहेरच्या बाजूने असायचे आणि हे दरवाजे सहज निघायचे . ह्या दारांना वंगण लावलेलं असायचं त्यामुळ हे दरवाजे होळीत रसरसून पेटायचे. होळीच्या काळात हे दरवाजे हमखास रात्री उशिरा पळवून नेउन होळीत टाकले जायचे म्हणून रात्री प्रत्येक घरातले काही जण आपापल्या दारात झोपायचे . आमच्या घरच्यां सोबत मी हि घराबाहेर झोपायचो . मार्च महिना असल्याने थंडी जवळ जवळ संपलेली असायची आणी वातावरणात छान उबदारपणा असायचा . अंथरुणावर पडल्या पडल्या होळीच्या ज्वाला दिसायच्या . अधून मधून कुणीतरी त्यात मीठ टाकायचा आणि त्यामुळे त्याचा चर्र असा आवाज व्हायचा . लांब कुठेतरी कुणा उत्साही व्यक्तिमत्वाने ठोकलेली बोंब ऐकू यायची हे सगळ ऐकत ऐकत आणि बघत बघत डोळा लागायचा .
सकाळी जाग यायची तेंव्हा होळीच्या धुमा-यावर भांडी ठेऊन गल्लीवाले आंघोळीसाठी पाणी तापवत असायचे . आमच्या ही घरी ते पाणी आणलं जायचं आणि ते पाणी आंघोळ करताना काही वेगळच वाटायचं ...............................श्याम सावजी ..............पंढरपूर